इचलकरंजीतील शाहिरी झंकार थंडावला
अतुल भोसले/इचलकरंजी
महाराष्ट्र शासनासह राज्य शाहीर परिषदेने शाहीर भूषण पुरस्कार देवून गौरवलेले ज्येष्ठ शाहीर राजाराम सखाराम जगताप (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने वस्त्रनगरीतील शाहिरी व साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
ब्रिटीशांच्या राजवटीत ४ मार्च १९३० रोजी शाहीर जगताप यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासून कुस्तीच्या आखाड्यात शाहिरांच्या शरीराची आणि सुदृढ विचारांची जडणघडण झाली. वडील सखाराम जगताप हे त्या काळातील
नावाजलेले पैलवान असल्याने त्यांनी घरातच तालमीचा आखाडा सुरू केला. आजही गावभागातील जगताप तालीम प्रिसद्ध आहे. पीळदार शरीरयष्टी लाभलेल्या राजाराम जगताप यांनी पायाच्या दुखापतीमुळे १९४८ मध्ये कुस्तीला रामराम ठोकला. त्यानंतर थोरले बंधू शाहीर गंगाराम जगताप यांच्या शाहिरीच्या अनेक कार्यक्रमात राजाराम जगताप यांनी साथ दिली. यातूनच शाहिरीविषयी त्यांच्यामध्ये आवड निर्माण झाली. त्यातून इचलकरंजी पालिका निवडणुकीत माळी मास्तरांच्या संघटनेचा प्रचार करण्यासाठी १९५२ मध्ये राजाराम जगताप यांनी पहिल्यांदा हातात डफ घेतला. त्यांनी चालू केलेल्या शाहिरी फडामध्ये
त्यांच्यासोबत पैलवान रामू आंबी, महादेव शिंदे, आण्णा शिंदे, बंधू रामभाऊ जगताप, दत्तात्रय जगताप, कै. शंकर लंगोटे, नाना घोरपडे अशा अनेक साथीदारांचा सहभाग होता.
फक्त चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या राजाराम जगताप यांनी उदरनिर्वाहासाठी हातमाग चालवले. यावेळी कापड विणताना त्यांची काव्यरचना सुरू असायची. मुळातच पैलवानी शरीरयष्टी व भारदस्त आवाजाची ईश्वरी देणगी लाभलेल्या शाहीर राजाराम जगताप यांनी ४० वर्षांत आपल्यातील प्रगल्भ शाहिरीची ओळख अवघ्या महाराष्ट्राला करून दिली. पाकिस्तान आणि चीनबरोबर झालेल्या युद्धाच्या कालखंडात त्यांच्या शाहिरीने भारतीय सैनिकांसह देशवासीयात देशभक्तीचे स्फुरण चढवले. १९७२ मध्ये आकाशवाणी व १९८३ मध्ये दूरदर्शनवर त्यांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. १९८३ मध्ये इचलकरंजीत भरलेल्या महाराष्ट्र शाहीर परिषदेचे ते अध्यक्ष होते. शेवटच्या श्वासापर्यंत रांगड्या आवाजाचा बाज सांभाळलेल्या, शहरातील कला, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील अवलिया शाहीर राजाराम जगताप यांनी राहत्या घरी वयाच्या ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
प्रसिद्ध झालेले साहित्य– झुंजार वीरांची गाथा (पोवाडा), शाहिस्तेखानाची
धुळदान, महात्मा ज्योतिबा फुले, चीनी रणसंग्रम, रसिका तुमच्याचसाठी,
छत्रपती शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, महापराक्रमी छत्रपती शिवाजी
महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, शूरवीर तानाजी मालुसरे, वंदनीय
बसवेश्वर महाराज, परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज.
मिळालेले पुरस्कार– शाहिरीसाठी शासनाचा राज्य पुरस्कार, पुणे महानगर
पालिकेचा पठ्ठेबापुराव पुरस्कार, कोल्हापूर महानगरपालिकेचा शाहिरी
पुरस्कार, कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचा शाहिरी सरसेनापती पुरस्कार,
राज्य शाहीर परिषदेचा शाहीर भुषण पुरस्कार.
प्रत्यक्ष भेटीतून शाहिरीचे कौतुक यांनी केले….
तत्कालिन गृहमंत्री कै. बाळासाहेब देसाई, माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा
पाटील, कै. विलासराव देशमुख, माजी मंत्री अशोकराव चव्हाण,
उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावतीदेवी, ग. दि. माडगुळकर, पु. ल.
देशपांडे, रणजीत देसाई, जयसिंगराव पवार, पी. बी. पाटील, आ. ह. साUुंखे,
ज्ञानेश्वर महाराव, राहुल सोलापुरकर, मधु कांबीकर, प्रभाकर पणशीकर,
सुलोचना चव्हाण.