ऑनलाईन टीम / मेरठ :
गेल्या अनेक वर्षांपासून मेरठमध्ये पुरातत्व विभागाचे कार्यालय बनवण्यात यावे अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आज म्हणजेच बुधवारी पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी ट्विट करत मेरठमध्ये पश्चिमी उत्तर प्रदेशचे नवीन कार्यालय सुरू केले जात असल्याची घोषणा केली.
दरम्यान, येथे हस्तीनापूर, बिजनौर, बागपद आदी ठिकाणी मोठ्या संख्येने पौराणिक स्थळे आहेत. याठिकाणी बऱ्याच वेळा पुरातन काळातील महत्वाचे अवशेष मिळालेले आहेत. त्याबाबत आग्र्यातील पुरातत्त्व विभागातील टीमला कळवण्यात आले होते. मात्र ते दूर असल्यामुळे रिपोर्ट येण्यास वेळ लागत असे. हे लक्षात घेऊन मेरठमध्ये नवीन कार्यालय सुरू करण्यात यावे अशा मागणीने जोर धरला होता.
काही दिवसांपूर्वी खासदार राजेंद्र अग्रवाल यांनी देखील पर्यटन मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी हस्तिनापुर आणि सिसौलीमध्ये पुरातन काळातील महत्त्वाचे अवशेष मिळत आहेत असे सांगितले होते. आत्तापर्यंत आग्र्यातील मुख्यालयातूनच मेरठमधील पुरातत्व विभागाचे काम पाहिले जात होते.