नोंदणी महानिरीक्षकांचे निर्देश
प्रतिनिधी / मालवण:
जिल्हय़ात दुय्यम निबंधक कार्यालयाकडून डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा मूल्यांकनासाठी नाकारण्यात आल्याबद्दल राज्याचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक शुल्क नियंत्रक, पुणे यांच्याकडे दाद मागण्यात आली होती. या तक्रारींवर नोंदणी महानिरीक्षक यांनी डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा मूल्यांकनासाठी ग्राहय़ धरण्यात यावा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
दुय्यम निबंधक, ओरोस कार्यालयामार्फत मूल्यांकन करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 न स्वीकारता, तलाठय़ांची स्वाक्षरी असल्याशिवाय मूल्यांकन केल्याचा दाखला देणार नाही, असे सांगितल्याने याबाबत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवर आदेश देताना शासनातर्फे राज्यातील 99 टक्के गाव नमुना नं. 7/12 डिजिटल स्वाक्षरीत करण्यात आले असून ते महाभूमी पोर्टलवर https://digitalsatbara.mahabhumi.gov.in नागरिकांना डाऊनलोड करून घेण्यासाठी उपलब्ध असून अशा डिजिटल स्वाक्षरीत 7/12 ची सत्यता पडताळणी त्यावर छापण्यात आलेल्या 16 अंकी पडताळणी क्रमांक अथवा क्यूआर कोडच्या आधारे महाभूमी पोर्टलवर करता येईल. असे सर्व डिजिटल स्वाक्षरीत 7/12 सर्व कायदेशीर व शासकीय कामांसाठी ग्राहय़ समजण्यात येतात, तरी अशा डिजिटल स्वाक्षरीत असलेल्या 7/12 वर तलाठी अथवा अन्य कोणत्याही महसूल अधिकारी यांच्या सही-शिक्क्याची आवश्यकता नाही, असा शेरा नमूद केलेला आहे. अशा सर्व डिजिटल स्वाक्षरीत 7/12 ची सत्यता महाभूमी पोर्टलवरून पडताळणी क्रमांक वापरून करता येते तसेच सर्व 7/12 तीन वर्षाच्या पीक पाहणीसह दुय्यम निबंधक लॉगीनला आय सरिता प्रणालीमध्येही उपलब्ध आहेत. असे सर्व डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मूल्यांकनासाठी ग्राहय़ समजण्यात यावेत व जिल्हा निबंधक यांनी संबंधितांना सूचना द्याव्यात, असेही ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुण्याचे राज्य समन्वयक यांनी स्पष्ट केले आहे.