चिपळुणातील रस्ते वाढीव खर्च नामंजुरी ठराव रद्द करण्यासाठी ठेकेदाराने घेतलेय जिल्हाधिकाऱयांकडे धाव
प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील रस्ते वाढीव खर्च नामंजुरीचा ठराव रद्द करण्याप्रश्नी होणाऱया सुनावणीचे पत्र उशिरा मिळाल्याने म्हणणे सादर करण्यास वेळ मिळाला नाही असे पत्र नगरसेवक अविनाश केळसकर यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱयांना सादर केले. त्यामुळे यादिवशी होणारी सुनावणी पुढे गेली आहे.
25 फेबुवारी रोजी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक केळसकर यांनी हा ठराव मांडला असून त्याला नगरसेविका स्वाती दांडेकर यांनी अनुमोदन दिले आहे. मात्र यामुळे ठेकेदारांचे मोठे नुकसान होत असल्याने हा ठरावच रद्द करावा अशी मागणी सोनाली कन्स्ट्रक्शन व आरती कन्स्ट्रक्शनचे राजेंद्र बेर्डे यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे. त्यामुळे यावर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार होती. तसे पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक यांनी केळसकर, दांडेकर यांना दिले होते. या सुनावणीला उपस्थित न राहिल्यास किंवा लेखी म्हणणे सादर न केल्यास आपल्याला म्हणणे दाखल करायचे नाही, असे गृहित धरून पुढील कार्यवाही केली जाईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते.
त्यामुळे केळसकर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले. त्यांनी सुनावणी असल्याचे पत्र उशिरा मिळाल्याने म्हणणे सादर करण्यास वेळ मिळाला नाही. तसेच यासाठी आपण वकीलपत्र देणार आहोत असे पत्र दिले. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून तिची तारीख लवकरच संबधितांना कळवली जाणार असल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.