प्रतिनिधी / देवबाग:
लॉकडाऊनच्या काळात कंटाळा आलेल्या आणि पर्यटनासाठी बाहेर पडू इच्छिणाऱया प्रत्येकासाठी आनंदाची बातमी आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टारंट आणि ई-पासबाबत काही नियम शिथिल केल्यानंतर आता महाराष्ट्र पर्यटन मंडळानेदेखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमटीडीसीचे कोकणातील सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्स सुरू करण्यात येणार आहेत. सर्व खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असल्याने शंभर टक्के बूकिंग घेतले जाणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनेही बूकिंग होणार असून पर्यटकांना शासनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी याची माहिती दिली आहे.
पर्यटकांना सेल्फ डिक्लरेशनचा फॉर्म भरून देणे अनिवार्य असून कोविडबाबतची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच पर्यटकाचे तापमान, त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हलदेखील तपासली जाणार आहे. फेस मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर देखील अनिवार्य असून गर्दी होणार नाही, याची देखील काळजी घेतली जाणार आहे. दरम्यान, पूर्ण क्षमतेने सुरू करीत आहोत. सर्व खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन बूकिंगला प्राधान्य दिले जाणार असून त्यानंतर काऊंटर बूकिंग केले जाणार आहे. शंभर टक्के ऑनलाईन बूकिंग पूर्ण झाले असल्यास काऊंटर बूकिंग मात्र केली जाणार नाहीत. याबाबत शासनाने आदेश देखील काढले असून यामध्ये पर्यटकाने काय काळजी घ्यावी, नियम काय असणार आहेत याची इत्यंभूत माहिती दिली जाणार आहे.
त्यामुळे आता सिंधुदुर्गमधील तारकर्ली, कुणकेश्वरसह वेळणेश्वर, गणपतीपुळे येथील हॉटेल्स सुरू केली जाणार आहेत. कन्टेनमेंट झोनमधील पर्यटकांना मात्र यावेळी बंदी असणार आहे. शिवाय, ज्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटरकरता या रिसॉर्ट आणि हॉटेलचा वापर केला गेला होता. ती सर्व टप्प्याटप्प्यानं सुरू केली जाणार असल्याची माहिती माने यांनी दिली.