रिझर्व्ह बँकेची माहिती : अर्थव्यवस्थेला सावरण्यास होणार मदत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात देशाचा विदेशी चलन साठा 3.883 अब्ज डॉलरने वाढून 541.431 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचला आहे, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सादर केलेल्या आकडेवारीमधून समोर आली आहे. 21 ऑगस्ट रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ामध्ये विदेशी चलन साठा 537.548 अब्ज डॉलरवर राहिला आहे. साधारणपणे 5 जूनरोजी पहिल्यांदा विदेशी चलन साठा 500 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचत 501.7 अब्ज डॉलरवर गेल्याची नेंद केली आहे.
एका बाजूला आर्थिक मंदीचे सावट गडद होत असून जीडीपी आकडेवारीत विक्रमी घसरण नोंदवली जात आहे. यामध्येही विदेशी चलन साठय़ामध्ये का वाढ झाली आहे, असा प्रश्न उपस्थित झाल्याचे पहावयास मिळत आहे. भारतीय शेअर बाजारांमध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक वाढल्याच्या कारणामुळे विदेशी चलन साठा तेजीत राहिल्याची नोंद केली आहे. मागील काही महिन्यांमध्ये विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी विविध भारतीय कंपन्यांमध्ये हिस्सेदारी वाढवली असल्याचाही लाभ झाल्याचे दिसून आले आहे.
सदर कारणांसोबत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाल्याने आयात बिल कमी झाले आहे. यामध्ये विदेशी चलन साठय़ाचे ओझे घटलेले आहे. यात विदेशातून पाठविण्यात येणारे पैसे आणि विदेशी प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.