प्रतिनिधी / खेड :
भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक संस्था संचलित ज्ञानदीप विद्यामंदिरमधील दोघांना कोल्हापूर येथील उद्योजक बाळासाहेब कडोलकर यांच्याकडून कै. यल्लोजीराव ईश्वर कडोलकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 5 हजार रूपयांचा रोख पुरस्कार देण्यात आला.
ज्ञानदीपमधील निधी भुवड हिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 100 टक्के गुण मिळवत बोर्डासह प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. याच विद्यालयातील सौरभ कानेटकर याने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 93.23 टक्के गुण प्राप्त करत विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल कै. परशुराम दामोदर भाजेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार त्याला देण्यात आला.
हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्याहस्ते दोघांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, नियामक मंडळाचे चेअरमन पेराज जोयसर, विनोद बेंडखळे, भालचंद्र कांबळे, महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा आदी उपस्थित होते.