प्रतिनिधी/ बेळगाव
संत रोहिदास कॉलनी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी घरातील वस्तू लांबविल्या आहेत. बुधवार दि. 9 सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून यासंबंधी उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
सतीश कोळवी यांच्या घरात चोरीचा प्रकार घडला आहे. सायंकाळी 5 वाजता आपल्या घराला कुलूप लावून सतीश व त्यांचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री दहा वाजता ते घरी परतले, त्यावेळी दरवाजा उघडा होता. घरातील वस्तू चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरटय़ांनी एक एलईडी टीव्ही, एक लॅपटॉप, एक गॅस सिलिंडर, एक तांब्याचा हंडा अशा घरगुती वस्तू पळविल्या आहेत. घटनेची माहिती समजताच उद्यमबागचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यासंबंधी पोलीस पुढील तपास करीत आहेत.