वृत्तसंस्था/ मुंबई
पर्यावरण, सामाजिक दृष्टीकोन आणि दर्जेदार प्रशासन या तीन इएसजींवर अधिकाधिक भर देणाऱया कंपन्यांमध्ये सातत्यपुर्ण गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्यूअल फंडाने इएसजी हा मुदतमुक्त प्रकारातील नवीन फंड बाजारात आणला आहे. या कंपन्यांसाठी निश्चित केलेल्या घटकांआधारे त्यांना इएसजी गुणांक दिले जाणार असून त्यानंतरच या कंपन्यांची निवड करत त्यात गुंतवणूक केली जाणार आहे.
जबाबदारीचे भान राखत गुंतवणूक करण्याच्या वाढत्या प्रवाह आणि गरजेकडे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इएसजी फंड लक्ष देणार आहे. नवीन फंड गुंतवणूकीसाठी 21 सप्टेंबरला खुला होणार असून 5 ऑक्टोबर 2020ला बंद होणार आहे. भारतात इएसजी संकल्पना ही अद्यापही बाल्यावस्थेत असून त्याचे लाभ मिळविण्याच्या खूप संधी आहेत. त्या तुलनेत जागतिक पातळीवर इएसजी आधारीत गुंतवणूक खुपच प्रचलित झालेली आहे.
नवीन फंडाची घोषणा करताना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निमेश शहा म्हणाले की, सातत्यपुर्ण गुंतवणूकीला अनुसरुन उत्तम गुंतवणूक वाढत आहे. येत्या काही वर्षात भारतात इएसजी पध्दतीने गुंतवणूक करण्याचा नवीन प्रवाह येणार आहे. भारतातील तरुण पिढी इएसजी घटकांबाबत अधिक जागरुक झालेली असून गुंतवणूक करताना ते याचा सखोल विचार करतात.
मॉर्निगस्टार डायरेक्ट या संस्थेने डिसेंबर 2019 मध्ये प्रकाशित केलेल्या अहलावानुसार इएसजीआधारीत गुंतवणूक 2009 मध्ये 21 अब्ज डॉलर होती. ती 2019 मध्ये 154 अब्ज डॉलरवर झेपावली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीच्या या नवीन योजनेचे व्यवस्थापन समभाग गुंतवणूक विभागाचे उप सीआयओ मृणाल सिंग हे करणार आहेत.