सणासुदीच्या कालावधीत ग्राहकांना विशेष सवलत मिळण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जवळपास 33 वर्षानंतर ऍपल ऑनलाईन रिटेल स्टोअर सुरु करत आहे. यामध्ये कंपनी येत्या 23 सप्टेंबरपासून भारतात आपल्या पहिल्या ऑनलाईन स्टोअरचा प्रारंभ करणार आहे. ऍपलने आपल्या मीडीया ब्लॉगच्या आधारे या संदर्भात माहिती सादर केली आहे.
सदरच्या स्टोअरच्या प्रारंभामुळे आता ग्राहक कंपनीचे थर्ड पार्टी स्टोअरच्या ऐवजी थेट ऍपल स्टोअरमधूनच उत्पादने खरेदी करु शकणार आहेत. सध्या कंपनी आपली उत्पादने ऍमेझॉन इंडिया, फ्लिपकार्टसह दुसऱया ई कॉमर्स प्लॅटफार्मच्या माध्यमांद्वारे विक्री करत आली आहे.
ऑनलाईन स्टोअरवर कस्टमर हेल्पचा पर्याय उपलब्ध करुन यात इंग्रजी आणि हिंदी दोन पर्याय असणार आहेत. यामध्ये ऍपलचे तज्ञ ग्राहकांना नवीन उत्पादनासंदर्भात माहिती देणार आहेत. याद्वारे ग्राहकांच्या मनातील अन्य शंकांचे निरसन करता येणार असून अन्य सुविधा मिळणार असल्याचे ऍपलने स्पष्ट केले आहे.
ग्राहकांसोबत जोडण्याचा प्रयत्न
आमच्या ग्राहकांसोबत संपर्कात राहणे सध्याच्या काळात खूप महत्त्वाचे आहे. यामुळे आम्ही ऑनलाईन स्टोअरची सुविधा सुरु करुन भारतामधील अन्य विस्तारावर भर देण्यात येणार असल्याचे ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी ट्वीट करुन म्हटले आहे.
उत्पादनांचा समावेश?
ऍपलच्या या नवीन ऑनलाईन स्टोअरवर आयफोन, आयपॅड, आयपॉड, मॅकबुक,ऍपल वॉच, ऍपल टीव्ही, आयमॅक यासारखी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यामध्ये सर्व प्रकारची उत्पादने विविध मॉडेलसह अनेक प्रकरात स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहे.