गुरुवारपासून इंजेक्शनची टंचाई
इंजेक्शन मिळवण्यासाठी कोरोना बाधितांच्या कुटूंबियांची धावपळ
कोविड केंद्रांसह मेडिकल्समध्येही इंजेक्शनचा दुष्काळ
कृष्णात चौगले / कोल्हापूर
अत्यवस्थ कोरोना रुग्णांसाठी रेमडीसीविर, टोसीलोमॉब व फ्लॉविपिराविर ही प्रभावी औषधे आहेत. यापैकी रेमडीसीविर इंजेक्शन हे अत्यंत गुणकारी ठरत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर इतर औषधांबरोबरच रेमडीसीविर इंजेक्शनचा अधिक वापर करावा असे परिपत्रक शासनाने 18 ऑगस्ट रोजी काढले आहे. त्यानुसार 20 ऑगस्टपासून सर्वच कोविड केंद्रांमध्ये या इंजेक्शनचा मोठय़ा प्रमाणात वापर सुरु झाला आहे. 17 सप्टेबरअखेर सुमारे 2 हजारांहून अधिक रुग्णांवर 13 हजार इंजेक्शनचा वापर झाला आहे. त्यामुळे बहुतांशी रुग्ण कोरोनाच्या मृत्यूरूपी दाढेतून बाहेर पडले आहेत. पण गुरुवारपासून या इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा जाणवत असून कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होत आहे.
लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेले बहुतांशी रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. तर श्वसनाचा त्रास होत असलेल्या मध्यम व तीव्र लक्षणाच्या रुग्णांवर शासकीय कोविड केंद्रांसह खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरु आहेत. कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव तत्काळ कमी व्हावा यासाठी अशा रुग्णांना रेमडिसीविर इंजेक्शन दिले जाते. साधारणपणे 10 ते 15 दिवसांच्या उपचारादरम्यान रुग्णाच्या प्रकृतीनुसार 4 ते 6 इंजेक्शन्स दिली जातात. त्याच्या वापरानंतर रुग्णांच्या प्रकृतीमध्ये तत्काळ सुधारणा होत आहे. हेट्रो, झायडस, सीप्ला, ज्युबिलंट, ग्लेनमार्ट आदी कंपन्यांकडून जिह्यात हे इंजेक्शन उपलब्ध केले जात आहे. कंपनीनिहाय 2 हजार ते 5 हजार 500 रूपयांपर्यंत त्याची किंमत आहे. सप्टेबर महिन्याच्या पुर्वार्धात हे इंजेक्शन जिल्हा परिषदेकडून मोफत दिले जात होते. पण आठ ते दिवस वाटप झाल्यानंतर तेथील साठा संपल्यामुळे आणि पुन्हा इंजेक्शन खरेदीसाठी निधीची तरतूद नसल्यामुळे मोफत वितरण बंद करण्यात आले. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची अर्थिक कोंडी झाली आहे. इतर उपचार खर्चाव्यतिरिक्त केवळ इंजेक्शनसाठीच 25 ते 30 हजार रूपये खर्च करावे लागत आहे. तरीही रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या नातेवाईकाला हे इंजेक्शन मिळवून देण्यासाठी नातेवाईकांची धडपड सुरु असलेली दिसते.
जिल्ह्यात दररोज सरासरी 1200 कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. यापैकी 20 टक्के म्हणजेच 240 रुग्णांना कोविड केंद्रांसह हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे. तर कोविड काळजी केंद्र, हॉटेल्स आणि गृह विलगीकरण होऊन 80 टक्के (960) रुग्ण उपचार घेत आहेत. हॉस्पिटल्समध्ये दाखल होणार्या 20 टक्के रुग्णांपैकी 4 टक्के (48) रुग्णांना आयसीयू बेड तर 16 टक्के (192) रुग्णांना ऑक्सीजनेटेड बेडचा आधार घ्यावा लागत असून त्यांना इंजेक्टेबल औषधे द्यावी लागतात. यामध्ये रेमडीसीविर इंजेक्शन कोरोनाबाधितांसाठी वरदान ठरत आहे. त्यामुळेच आरोग्य विभागाकडून सर्व अत्यवस्थ रुग्णांसाठी त्याचा वापर केला जात आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून जिह्यात या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे. कोल्हापूरातील सर्व कोविड केंद्रे, मेडिकल्सच्या पायऱया झिजवूनदेखील इंजेक्शन मिळत नसल्यामुळे रुग्णांवरील उपचारात अडथळा निर्माण होत आहे.
आजपासून इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल
अत्यवस्थ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी प्रभावी ठरलेल्या रेमडीसीविर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दोन दिवस थोडी टंचाई जाणवली असली तरी शनिवारी (19 सप्टेबर) मुबलक प्रमाणात इंजेक्शनचा साठा उपलब्ध होईल. हेट्रो, सिप्लासह इतर औषध कंपन्यांना त्याबाबत सूचना दिल्या आहेत. इंजेक्शनच्या साठय़ावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे सर्व रुग्णांना इंजेक्शन मिळेल. त्यासाठी कुटूंबियांना धावपळ करावी लागणार नाही.
मनिषा जवंजाळ-पाटील, सहाय्यक आयुक्त, औषध विभाग