लष्करी कवायतीदरम्यान घडल्याचा दावा, मात्र पुष्टी नाही
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाच्या एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे भारतासह सदर यंत्रणा खरेदी केलेल्या अनेक देशांची चिंता वाढली आहे. या व्हिडीओमध्ये एस -400 यंत्रणेचे एक क्षेपणास्त्र चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर जमिनीवर कोसळताना दिसते. सोमवारपासून सुरू झालेल्या कॉकॅसस-2020 या सामरिक लष्करी सरावादरम्यान हा व्हिडीओ चित्रित करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. चीन, पाकिस्तान आणि इराणसमवेत जगातील जवळपास 12 देशांनी या सरावामध्ये भाग घेतला आहे.
सदर व्हायरल व्हिडीओमध्ये रशियन एस-400 व्यवस्थेची दोन क्षेपणास्त्रे नीट डागली जातान दिसत आहेत, परंतु तिसरे क्षेपणास्त्र बरोबर डागले न जाता ते जमिनीवर पडताना दिसते. यामुळे क्षेपणास्त्र प्रक्षेपकही नष्ट झाले. हे क्षेपणास्त्र कोसळताच जवळ उभे असलेले रशियन सैनिक आपला जीव वाचवण्यासाठी पळून जाऊ लागल्याचे आणि यावेळी जमिनीवर भरपूर धूरही आल्याचे दिसून येते.
तथापि, एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणेबद्दल व्हायरल होत असलेला व्हिडिओ कॉकॅसस-2020 चा आहे की नाही याची पुष्टी झालेली नाही. क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान घडलेली ही एक सामान्य घटना असू शकते. परंतु जर हे लष्करी कवायतीच्या दरम्यान घडलेले असेल, तर यामुळे रशियाची चिंता वाढेल. कारण एस-400 प्रणाली जगातील सर्वोत्तम मानली जाते. भारताने देखील रशियाकडून सदर प्रणाली खरेदी केली आहे.