चिखलगाव पोस्टातून विविध योजनांच्या लाभार्थी यादीतील मृतांच्या खात्यातील रक्कमेचा अपहार
वार्ताहर/ मौजेदापोली
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील पोस्टात झालेले अपहार प्रकरण ताजे असतानाच तालुक्यातील चिखलगाव पोस्टातून राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थी यादीतील मृतांच्या खात्यातील रक्कमेचा अपहार झाल्याचे प्रकरण उघड झाले आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीची चौकशी ही पोस्ट विभागाकडून सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
संजय गांधी निराधार पेन्शन योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे निवृत्ती वेतन पोस्टातील बचत खात्यात दरमहा जमा केले जाते. चिखलगाव सबपोस्ट कार्यालयाला चिखलगाव, किन्हळ व बोरिवली ही गावे जोडलेली असून सुमारे तीन हजार खातेदारांची बचत खाती आहेत. त्यांच्या खात्यात दरमहा निवृत्ती वेतन जमा होते. मात्र या बचत खात्यातून पैसे काढले जात नाहीत. याचा फायदा घेऊन चिखलगाव येथील पोस्टातून काही मृतांच्या खात्यातून बनावट सही करून रक्कम काढून अपहार केल्याची तक्रार मुख्य पोस्टमास्तरकडे करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाद्वारे लाभार्थ्यांचा सर्वे न झाल्याने त्यांची नावे वगळली नाहीत. त्यामुळे त्याचा फायदा उठवण्यात आला. टपाल विभागाकडून या प्रकरणाची चौकशी झाली. यापैकी काही रक्कम भरूनही घेतल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोस्टाच्या सूत्रांनी सांगितले.
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथेही अशाप्रकारे अपहार झाल्याची घटना घडली होती आणि या घटनेची चौकशीदेखील सुरू आहे. असे असताना पुन्हा चिखलगाव येथील हे अपहार प्रकरण उघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या पोस्ट खात्यावरील विश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी दापोलीकरांकडून होत आहे.