आटपाडी / प्रतिनिधी
समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि गावकुसाबाहेरील लोकांना आरक्षण लागु करणारे क्रांतिकारी व्यक्तीमत्त्व छत्रपती शाहु महाराजांचा वारसा असलेले छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांना धनगर आरक्षणप्रश्नी साद घालण्यात आली आहे. खासदार असलेल्या दोन्ही छत्रपतींनी धनगर एसटी आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांना पत्र लिहुन आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणप्रश्नी छत्रपतींच्या वारसांना साद घातली आहे. महाराष्ट्रातील धनगर समाज अनेक वर्षांपासुन एसटी आरक्षणासाठी लढा देत आहे. परंतु सरकार आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत गंभीर नाही. महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भुमिका घेतली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि एक संवेदनशील व्यक्तीमत्त्व म्हणुन खासदार उदयनराजेंनी धनगर आरक्षणाला पाठींबा द्यावा, असे साकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातले आहे. आरक्षणाचे जनक असलेले राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी उपेक्षीत समाजाला नेहमीच न्याय दिला. त्यांचा वारसा चालविणारे छत्रपती संभाजीराजे यांचा आरक्षणाबाबतचा लढा सर्वज्ञात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनीही धनगर आरक्षणाला पाठींबा दर्शवावा.
या दोन्ही छत्रपतींच्या वारसांकडुन धनगर आरक्षणाला पाठींबा मिळाल्यास आमच्या समाजाच्या लढ्याला हत्तीचे बळ मिळेल, असा विश्वासही भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला