8 हजार 526 उमेदवारांनी दिली टीईटी
प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱया व शिक्षक होऊ पाहणाऱया उमेदवारांनी रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. सीईटी परीक्षेत एन्ट्री मिळविण्यासाठी आवश्यक असणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अखेर विलंबाने का होईना यशस्वीपणे पार पडली. डीएड, बीएडधारक असणाऱया व शिक्षक होऊ पाहणाऱया उमेदवारांनी शिक्षक भरतीची पहिली पायरी आजमावली. सदर परीक्षेत उत्तीर्ण झाल्याखेरीज सीईटीत प्रवेश मिळणार नसल्याने कोरोनाच्या संकटातही प्रवास, कुटुंब, नोकरी, अभ्यास यांचा ताळमेळ साधत एकूण 8 हजार 526 उमेदवारांनी टीईटीला हजेरी लावली, तर 1 हजार 689 उमेदवार परीक्षेला गैरहजर होते.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात शिक्षक पात्रतेसाठी एकूण 23 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होते. प्राथमिक शाळा शिक्षक पात्रतेसाठी सकाळच्या सत्रात पेपर पार पडला तर दुसरा पेपर पदवी प्राथमिक शिक्षक इ. 6 वी ते 8 वी शिक्षक पात्रतेसाठी घेण्यात आला. दोन्ही पेपरच्या दरम्यान एक तास आधी विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग व सॅनिटायझर्स तसेच मास्कची सक्ती अशा कोरोना मार्गदर्शक तत्वांचे पालन करत विद्यार्थ्यांना केंद्रावर प्रवेश देण्यात आला. यामुळे परीक्षार्थींची संख्या अधिक असली तरी अचूक व्यवस्थेत परीक्षा पार पडली. पहिल्या पेपरच्या तुलनेत दुसऱया पेपरसाठी विद्यार्थी संख्या अधिक होती.
कोरोनामुळे विविध परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. परिणामी मार्च महिन्यात होणारी टीईटी देखील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तीन वेळा लांबणीवर पडली होती. मात्र अखेर रविवारी परीक्षा झाल्याने शिक्षक होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सदर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेचा मार्ग मोकळा होणार आहे.