युवराज पाटील/ सांबरा
पूर्व भागातील मोदगा येथे गुऱहाळ हंगामाला प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे बेळगावकरांना लवकरच रुचकर गुळाची चव चाखता येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक महिना आगाऊ गुऱहाळ हंगामाला प्रारंभ करण्यात आला आहे.
दरवर्षी सर्वप्रथम मोदगा येथे गुऱहाळ हंगामाला प्रारंभ करण्यात येतो. येथील गुऱहाळ व्यावसायिक शिवाजी रामप्पा रामणे यांनी गुऱहाळाला प्रारंभ केला आहे. त्या पाठोपाठ गुरुवारपासून देवाप्पा विठाप्पा मुगळी यांनी गुऱहाळाला प्रारंभ केला असून इतर गुऱहाळ घरे चालू करण्यासाठी गुऱहाळ मालकांची लगबग सुरू आहे. यंदा पूर्व भागामध्ये उसाचे उत्पादन वाढले असून ऊस पीकही जोमात आले आहे. सुरुवातीला गुळाला चांगला दर मिळत असल्याने गुऱहाळ घरे लवकर सुरू करण्याकडे गुऱहाळ मालकांचा ओढा आहे.
बेळगाव तालुक्याच्या तुलनेत पूर्व भागामध्ये गुऱहाळ घरे मोठय़ा प्रमाणावर चालविण्यात येतात. सांबरा, मुतगा, बाळेकुंद्री खुर्द, होन्नीहाळ, माविनकट्टी, मोदगा, सुळेभावी, करडीगुद्दी येथे गुऱहाळ घरे चालविण्यात येतात. ऊस व भात ही या भागात घेतली जाणारी मुख्य पिके आहेत. अलीकडच्या काळात गुळाला चांगला दर मिळत असल्याने व साखर कारखान्यांकडून उसाची उचल करण्यासाठी चढाओढ असल्याचे शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे. दरवर्षी साधारण दसऱयानंतर गुऱहाळ घरे सुरू होतात. मात्र यंदा अधिकमास असल्याने दसरा होण्याआधीच गुऱहाळ घरांना प्रारंभ करण्यात आला आहे.
एकीकडे गुऱहाळ घरे चालविणे अवघड जात असताना पूर्व भागामध्ये मात्र गुऱहाळ घरे चालविण्याची परंपरा टिकवून ठेवण्यात आली आहे. अनेक अडचणींचा सामना करत येथील गुऱहाळ व्यावसायिक गुऱहाळ घरे चालवितात. गुऱहाळ घरांमुळे जनावरांना चारा मिळतो व अनेकांना रोजगारही उपलब्ध होतो. ऊस तोडणी करण्यापासून ते गुळ तयार करण्यापर्यंत एका गुऱहाळ घरात किमान सोळा ते सतरा मजुरांची आवश्यकता असते. सदर हंगाम किमान पाच ते सहा महिने चालतो. या दरम्यान परगावचे मजूर येथे रोजगारासाठी येऊन राहतात.
गुळाचा वापर प्रत्येक सणाला गोड पदार्थ बनविण्यासाठी तसेच गुळाचे औषधी गुणधर्मही असल्याने गुळाला जास्त मागणी असते. त्यामुळे सध्याच्या काळात गुळाचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक शाकाहारी खानावळी व हॉटेलमध्ये गुळापासून बनविलेली खीर, पुरणपोळी यांना चांगली मागणी असते. गुळाच्या चहाची तर मजाच काही और आहे. आरोग्याच्यादृष्टीनेही गुळाला जास्त महत्त्व असल्याने अनेकजण गुळाकडे आकर्षित होताना पाहावयास मिळते. येथील गुळ तर अतिशय चवदार व रुचकर असल्याने येथील गुळाला बाजारपेठेत ग्राहकांची मोठी मागणी असते.
दरवर्षी साधारण दसरा झाल्यानंतर आम्ही गुऱहाळाला प्रारंभ करतो. मात्र, यंदा अधिक मास असल्याने आम्ही दसऱयाआधीच गुऱहाळ घरांना प्रारंभ केला आहे. यंदा ऊस पीक चांगले असल्याने किमान पाच ते सहा महिने गुऱहाळघरे चालतील, असा अंदाज आहे.
मल्लिकार्जुन काडन्नावर, गुळाचे व्यापारी, बेळगाव
मोदगा येथील गुळ बेळगाव बाजारपेठेत दाखल झाले आहे. सध्या 3800 ते 3900 रुपये प्रति क्विंटल असा गुळाचा दर आहे. सध्या गुळाचा दर जास्त असला तरी दिवाळीनंतर दर कमी होण्याची शक्यता आहे.