सहा टन पावडर जप्त : बैलहोंगल पोलिसांची कारवाई : तरुणाला अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
सरकारी शाळेत शिकणाऱया गोरगरीब मुलांना दूध मिळावे यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी क्षीरभाग्य योजनेसाठीच्या दूध पावडरचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार उघडकीस आला आहे. बैलहोंगल पोलिसांनी सहा टन दूध पावडर जप्त केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी ही माहिती दिली.
बैलहोंगलचे पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी, पोलीस उपनिरीक्षक इराप्पा रिती, यु. एच. पुजेर, एस. ए. कब्बूर, एस. वाय. वरण्णावर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. नेगिनहाळ येथील आरोग्य साहाय्यक गंगाप्पा कल्लोळी यांचीही या कामी मदत घेण्यात आली आहे.
पुंडलिक बसाप्पा यक्कुंडी (वय 25, रा. व्हसाकुरगुंद) असे अटक करण्यात आलेल्या कँटरचालकाचे नाव आहे. प्रत्येकी 25 किलो वजनाची 240 दूध पावडरची पोती जप्त करण्यात आली आहेत. केए 48, 1162 क्रमांकाच्या गुड्स कँटरमधून या दूध पावडरची वाहतूक करण्यात येत होती. धारवाड येथील बेलूर औद्योगिक वसाहतीत हा साठा ठेवण्यात आला होता.
यासंबंधीची माहिती मिळताच जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, बैलहोंगलचे एएसपी प्रदीप गुंटी आदी अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली बैलहोंगल पोलिसांनी सहा टन दूध पावडर जप्त केली आहे. रविवारी ही कारवाई करण्यात आली आहे.