मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांची माहिती
प्रतिनिधी/ मडगाव
नागरिक केंद्रीत प्रशासन देण्यासाठी विविध गोष्टी चालू असून उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि वेळेची मर्यादा अशा प्रकारच्या सेवेस मडगाव पालिकेत लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली आहे. एखाद्या व्यक्तीचे काम विशिष्ट कालावधीच्या पलीकडे प्रलंबित ठेवले गेले असेल, तर संबंधित नागरिक आपल्या 7030910926 या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सऍप संदेश पाठवू शकतो, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले आहे.
सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्यास जन्म-मृत्यू दाखल्यातील दुरुस्त्या 3 दिवसांच्या आत केल्या जातील. तथापि त्याचदिवशी जर तातडीची गरज असेल, तर निकडीचा विचार करून ते काम प्राधान्यक्रमाने केले जाऊ शकते. अशावेळी नागरिक आपल्याला व्यक्तिशः भेटू शकतात, असे त्यांनी नजरेस आणून दिले आहे.
कचरा पडून असल्याची छायाचित्रे पाठवा
कचऱयाची समस्या एका दिवसात सोडविली जाईल. कचरा पडून असलेल्या ठिकाणाचे छायाचित्र काढून स्थानाची माहिती वा महत्त्वाच्या खुणांसह लोक ते व्हॉट्सऍपवर पाठवू शकतात. तत्काळ संबंधित पर्यवेक्षक उपस्थित होऊन सदर कचरा हटविला जाईल, असे आश्वासन फर्नांडिस यांनी दिले आहे.
कर्मचाऱयांची वृत्ती बदलणार
पालिका कर्मचाऱयांच्या वृत्तीत बदल होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांना अडचणी येऊ नयेत यासाठी कर्मचाऱयांना त्यांच्या वागणुकीत बदल करण्याकरिता प्रेरणा देऊन तसे केले जाईल, असे मुख्याधिकाऱयानी सांगितले. त्यांच्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवून चुकार अधिकाऱयांवर कारवाई केली जाईल. जनतेच्या कोणत्याही तक्रारीची काटेकोरपणे दखल घेतली जाईल. बेशिस्त कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले आहे.
गोमंतकीयांना प्राधान्य
आपल्याला माहीत आहे की, सुशेगाद दृष्टिकोन बदलणे कठीण आहे. परंतु त्यादृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. प्रशासन लोकांना अनुकूल बनविण्यासाठी बोजड नियम आणि प्रक्रिया सुलभ केली जाईल. गोमंतकीय वंशाच्या व्यक्तींना प्रथम प्राधान्य दिले जाईल आणि त्यांचे काम गतीने केले जाईल, असेही फर्नांडिस यांनी सांगितले.