ऑनलाईन टीम / जळगाव :
भाजपचे नेते गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेरमध्ये मंगळवारी जी. एम. फाऊंडेशच्या ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक दीपक तायडे यांना आलेल्या निनावी फोनवरून ही धमकी देण्यात आली. गिरीश महाजन यांना एक कोटी रुपये द्यायला सांग. नाही तर त्यांना बॉम्बने उडवून देऊन, असे धमकावणाऱ्याने तायडेंना सांगितले.
खंडणीसाठी धमकावणाऱ्याने केवळ फोनच केला नाही तर त्याच फोनवर धमकावणारा मेसेजही पाठवला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक कोटी रुपये द्या नाही तर बॉम्ब ब्लास्ट करू, अशी धमकी यावेळी देण्यात आली होती, अशी माहिती तायडे यांनी दिली. धमकी देणारा हिंदीत बोलत होता, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. याप्रकरणी महाजन यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. तसेच त्यांनी कुणावरही संशय व्यक्त केला नाही.