पुढील आठवडय़ात निकाल जाहीर होण्याची शक्यता
प्रतिनिधी / बेळगाव
एसएसएलसी पुरवणी परीक्षेची मूल्यमापन प्रक्रिया नुकताच पूर्ण झाली असून दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल पुढील आठवडय़ात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 7 ऑक्टोबरपासून जिल्हय़ात 6 केंद्रांवर मूल्यमापन प्रक्रियेला सुरुवात झाली होती. त्यानुसार पेपर तपासणीचे काम पूर्ण करत गुणांची ऑनलाईन नोंदी करून पेपर बेंगळूर विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. यामुळे पुढील आठवडय़ाच्या प्रारंभीला निकाल जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली.
लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या एसएसएलसी परीक्षेत अनुत्तीर्णांची संख्या वाढली होती. यामुळे पुरवणी परीक्षेच्या पेपरची संख्या देखील जास्त होती. परिणामी जिल्हय़ात 424 शिक्षकांकडून नियोजित वेळेनुसार मूल्यमापनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे निकाल लवकर जाहीर होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. यंदा सदर परीक्षेला विलंब झाला असून यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर सदर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.