वार्ताहर / पाचगाव
आर के नगर परिसरातील विद्युत वितरण कंपनीमधील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा मनमानीपणा सुरू असून या कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. एकदा लाईट गेली की अनेक तास त्याच्या दुरुस्तीकडे हे कर्मचारी लक्ष देत नाहीत . यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
पाचगाव, कंदलगाव, मोरेवाडी, आर के नगर व गिरगाव या गावातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम आर के नगर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयामार्फत करण्यात येते. या चार गावांमध्ये विद्युत वितरण कंपनीचे सुमारे 19 हजार ग्राहक आहेत. मात्र या 19 हजार ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी केवळ चारच कर्मचारी आर के नगर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात आहेत.
या कर्मचार्यांवरही येथील शाखा अभियंत्याचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. एखाद्या परिसरातील लाईट गेल्यास कित्येक तास त्याच्या दुरुस्तीसाठीही हे कर्मचारी तिकडे फिरकत नाहीत. या कार्यालयातील एक कर्मचारी तर माझी बदली झाली असून मी ग्राहकाची एखादी तक्रार आल्यास त्याची दखल घेणार नाही असे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सांगतो. वास्तविक या कर्मचाऱ्याला आर के नगर येथील कार्यालयातून अद्याप रिलीव्ह करण्यात आलेले नाही.
हे कर्मचारी येथील शाखा अभियंत्यांनाही जुमानत नाही. त्यामुळे येथील कार्यालयातील कर्मचार्यांवर शाखा अभियंता यांचे नियंत्रण नाही. हे शाखा अभियंताही बहुतांशी वेळा नॉटरिचेबल असतात. नवीन मीटर जोडणी सारख्या कामांमधून पैसे मिळत असल्याने अशा कामांना या कार्यालयातील कर्मचारी प्राधान्य देतात अशा तक्रारी ग्रामस्थांमधून येत आहेत. येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीबद्दल या परिसरातील नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.