वृत्तसंस्था/ लंडन
बहरीनची आंतरराष्ट्रीय दर्जाची धावपटू तसेच 400 मी धावण्यांच्या शर्यतीतील विश्वविजेती सलवा इद नासेर हिच्यावर ठेवण्यात आलेला उत्तेजक चांचणी चुकविल्याचा आरोप रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती ऍथलेटिक्स संघटनेतर्फे मंगळवारी देण्यात आली.
गेल्या जूनमध्ये 22 वर्षीय नासेरवर हंगामी स्वरूपाची तहकूबाची कारवाई करण्यात आली होती. तिच्यावर उत्तेजक चांचणी चुकवल्याचा आरोप करण्यात आला होता. चालू वर्षीच्या जानेवारी ते मार्च दरम्यान झालेल्या तीन उत्तेजक चांचणीसाठी ती उपलब्ध राहू शकली नाही, असा तिच्यावर आरोप होता. पण हा आरोप सिद्ध करता आला नाही. या प्रकरणाची सुनावणी विश्व ऍथलेटिक्स शिस्तपालन लवादासमोर झाली आणि या सुनावणीत नासेरवरील आरोप रद्द करण्यात आले. गेल्यावर्षी डोहा येथे झालेल्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत नासेरने महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत विश्वविक्रम नोंदविला होता.