वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा डावखुरा सलामीचा फलंदाज तन्मय श्रीवास्तवने शनिवारी येथे क्रिकेट क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली. 2008 साली मलेशियात झालेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक युवा क्रिकेट स्पर्धेत कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघातील श्रीवास्तवने आपल्या संघातर्फे या स्पर्धेत सर्वाधिक धावा नोंदविल्या होत्या.
30 वर्षीय तन्मय श्रीवास्तवने मलेशियात झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक युवा क्रिकेट स्पर्धेत सहा डावात 52.40 धावांच्या सरासरीने 262 धावा जमविल्या. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीवास्तवने 46 धावांची खेळी केली होती. भारताने दक्षिण आफ्रिकेचा अंतिम सामन्यात डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे 12 धावांनी पराभव करून विजेतेपद मिळविले होते. तन्मय श्रीवास्तवने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. 2008-09 क्रिकेट हंगामात उत्तरप्रदेश संघाकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये श्रीवास्तवने सर्वाधिक धावा जमविल्या होत्या. श्रीवास्तवने 90 प्रथमश्रेणी क्रिकेट सामन्यात 10 शतके आणि 27 अर्धशतकांसह 34.39 धावांच्या सरासरीने 4918 धावा जमविल्या.