मागील वर्षात नफा कमाई : फर्मची स्थिती मजबूत असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ मुंबई
रिटेल स्टोअर चालविणारी मार्क्स ऍण्ड स्पेंसर कंपनी 94 वर्षाच्या कालावधीत प्रथमच नुकसानीत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. सप्टेंबरच्या सहामाहीत कंपनीला जवळपास 851 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. एक वर्षापूर्वी समान कालावधीत 1,543 कोटी रुपये नफा कमाई झाल्याची नोंद आहे.
कंपनीला सध्या काहीप्रमाणात नुकसान सोसावे लागत असले तरी फर्मची कामगिरी मजबूत असल्याने ही परिस्थिती येत्या काळात बदलून जाईल असा विश्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव रोवे यांनी व्यक्त केला आहे.
सकारात्मक बाबी एका बाजूला असल्या तरी दुसऱया बाजूला काही प्रमाणात नकारात्मक कलही पहावयास मिळाले आहेत. ऑगस्टमध्ये कंपनीने 7 हजार जणांना पुढील तीन महिन्यांसाठी ब्रेक देण्याची घोषणा केली आहे. पहिल्या सहामाहीत समूहाची विक्री 39,746 कोटींवर राहिली आहे. कपडे आणि घरात वापरण्यात येणाऱया साहित्याची विक्री कमी झाल्यामुळे महसूलात घसरण राहिल्याची माहिती आहे.
जॉइंट वेंचरमध्ये तेजी
समूहाने आपल्या ओकाडो रिटेल जॉइंट वेंचरमध्ये चांगली मजल मारली आहे. यांच्या जोरावर सप्टेंबरमध्ये फूड डिलिव्हरीस प्रारंभ केला आहे. एकत्रितपणे झालेल्या व्यवसायातून विक्रीत जवळपास 47.9 टक्क्यांची वाढ प्राप्त केली आहे. या वातावरणामुळे नफा कमाईत काही प्रमाणात सुधारणा होत गेल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.