नागोर्नो-काराबाखच्या राजधानीपर्यंत धडक : आर्मेनियाला नुकसान
वृत्तसंस्था/ बाकू
अजरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात 27 सप्टेंबर रोजी सुरू झालेली लढाई अद्याप सुरूच आहे. याचदरम्यान अजरबैजानच्या सैन्याने तुर्कस्तान आणि इस्रायली शस्त्रास्त्रांच्या बळावर आर्मेनियाला प्रचंड नुकसान पोहोचविले आहे. उपलब्ध माहितीनुसार नागोर्नो-काराबाखची राजधानी स्टेपानाकेंटनजीक वसलेल्या शुशी शहरावर अजरबैजानच्या सैन्याने कब्जा केला आहे. आर्मेनियाच्या सैन्यात आता स्टेपानार्केटच्या सुरक्षेवरून चिंता वाढली आहे.
आर्मेनियाकडून हल्ल्याचा धोका वाढल्यास आपण तुर्कस्तानकडून सैन्य सहाय्य घेऊ, असे उद्गार अजरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी काढले आहेत. जर या युद्धात तुर्कस्तानने थेट सहभाग घेतल्यास आर्मेनियाची स्थिती अधिकच खराब होऊ शकते. परंतु सद्यस्थिती चांगली असल्याने तुर्कस्तानच्या सैन्याच्या मदतीची गरज नसल्याचे अलीयेव यांनी म्हटले आहे.
क्लस्टर बॉम्बने हल्ल्यांचा आरोप
अजरबैजानच्या सैन्याने नागोर्नो-काराबाखची राजधानी स्टेपानाकेर्टवर क्लस्टर बॉम्बनी हल्ला केल्याचा आरोप आर्मेनियाने केला आहे. अजरबैजानच्या या हल्ल्यात नागरी हानी झालेली नसल्याचे नागोर्नो-काराबाखच्या आपत्कालीन सेवेने म्हटले आहे. जगभरात क्लस्टर बॉम्बच्या वापरांवर बंदी आहे, अशा स्थितीत एखाद्या देशाने या बॉम्बचा वापर केल्यास त्याला युद्धगुन्हा मानले जाते.
पुतीन-एर्दोगान यांची चर्चा
आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यातील युद्ध संपुष्टात आणण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक संयुक्त कार्यगट निर्माण करण्याची घोषणाही केली आहे.
सप्टेंबरपासून लढाई सुरू
नागोर्नो-काराबाख भागात आर्मेनियन वंशाचे लोक बहुसंख्याक आहेत, तर आंतरराष्ट्रीय समुदाय याला अजरबैजानचा हिस्सा मानतो. सोव्हिएत संघाच्या विघटनापासूनच अजरबैजान या भागावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला कधीच यश मिळालेले नाही.