म्हासुर्ली / वार्ताहर
म्हासुर्ली ( ता राधानगरी ) येथील दुर्गम परिसरातील जनतेला आरोग्य सुविधा उपल्बध करण्याच्या दृष्टीने शासनाने मंजूर केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम नियम बाह्य व जाणीवपूर्वक रात्रीच्या वेळी अत्यंत निकृष्ट पद्धतीने सुरू असून संबंधित विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या दर्जाहिन कामाची तक्रार संबंधित विभागाच्या अधिकारीवर्गाकडे करुन इकडे कोणीच फिरकले नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ठेकेदारास धारेवर धरत काम बंद पडले.
जोपर्यत जिल्हा परिषदेचे जबाबदार वरिष्ठ अधिकारी येथे येऊन दर्जेदार कामाची हमी घेत नाहीत. तसेच झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करत नाहीत तोपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम काम बंद ठेवण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. दुर्गम व आरोग्य सेवेपासून वंचित असलेल्या धामणी खोऱ्यातील सुमारे ५०ते ६० वाड्यावस्त्यांच्या मागणीनुसार आ. प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून म्हासुर्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले असून गतवर्षी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.
सुमारे चार कोटी रुपये अंदाजित रकमेचे हे प्राथमिक केंद्र असून त्याचे बांधकाम मुख्य ठेकेदार कंपनी अंतर्गत पोट ठेकेदाराकडून सुरू आहे. सध्या प्राथमिक केंद्र इमारतीच्या पायाचे काम सुरु आहे. सदर कामाच्या भरावामध्ये ठेकेदाराकडून मुरमा ऐवजी माती केली आहे. तसेच खराब गठ्ठे झालेले सिमेंट, अत्यल्प सिमेंट, तसेच अन्य वस्तूंचे प्रमाण जास्त असून सर्व काम पूर्णतः अत्यंत निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. तसेच सदर काम मंजूर आराखड्यानुसार होत नसून त्याची जागा ही बदलल्याची नागरिकात चर्चा होत आहे.
ठेकेदार सदर इमारत बांधकाम नियमबाह्यपणे बहुतांशी वेळा रात्रीचे सुरू ठेवत असल्याने काही जागृत ग्रामस्थांचा सदर बांधकामाबाबत संशय बळावला होता. सदर ग्रामस्थांनी सकाळी जाऊन पाहिले असता रात्रीच्या वेळी करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थानीं आरोग्य केंद्राचे काम बंद पाडले.
सदर कामाच्या दर्जाबद्दलची तक्रार विभागाचे आमदार आबिटकर यांच्याकडे ग्रामस्थांनी करून याबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच आमदारांनी ही सूचना करूनही संबंधित विभागाने गुरुवारी चौकशी करीता कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी कामावर पाठवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक या कामाकडे न फिरकल्याने ग्रामस्थचा संताप अनावर झाल्याने व जबाबदार अधिकारी प्रत्यक्ष बांधकामास भेट देऊन चौकशी करत नाहीत तोपर्यत काम बंद ठेवण्याचे ग्रामस्थांनी ठेकेदारास सूचना दिल्या आहेत. यावेळी सदाशिव कांबळे, सागर पांडव, संभाजी कांबळे, नितीन कांबळे, अजित कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जि.प. समोर उपोषणाचा इशारा
सदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट बांधकामाबदल ठेकेदारासह अधिकाऱ्यांच्याकडे सूचना करुन ही सर्वांनी दुर्लक्ष केले आहे. तरी संबंधितानी झालेल्या कामाची चौकशी करुन कारवाई करावी अन्यथा जि.प समोर उपोषण करणार – सदाशिव कांबळे,ग्रामस्थ