वृत्तसंस्था / मुंबई
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर तसेच विंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने शुक्रवारी येथील गोल्फ मैदानावर काही वेळ गोल्फचा आनंद उपभोगला.
क्रिकेट क्षेत्रामध्ये सचिन आणि लारा यांचे द्वंद्व नेहमीच चुरशीचे पहावयास मिळाले. पण आता गोल्फ क्षेत्रातही सचिन आणि लारा यांच्यात चुरस पहावयास मिळाली. तब्बल तीन दशकांपूर्वी टोरँटोमध्ये पहिल्यांदा सचिन आणि लारा हे क्रिकेट क्षेत्रात प्रतिस्पर्धी म्हणून भिडले होते, याची आठवण सचिनने यावेळी करून दिली. सचिन आणि लारा यांच्यातील मैत्री अतूट असून ते चांगले स्नेही म्हणून ओळखले जातात.
टोरँटोमध्ये 1990 साली झालेल्या प्रदर्शनीय क्रिकेट सामन्यात सचिन आणि लारा हे प्रथम परस्पर विरोधी संघातून खेळले होते. पण गोल्फमध्ये शुक्रवारी मुंबईत हे पुन्हा परस्पर विरोधी पहावयास मिळाले. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 400 धावा नोंदविणारा लारा हा जगातील एकमेव फलंदाज असल्याने लाराच्या कुशलतेबद्दल अधिक सांगण्याची जरुरी भासत नाही, असे सचिन यावेळी म्हणाला.