डोनाल्ड ट्रम्प यांचे सूचक विधान : पराभव मान्य करण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्याच्या सुमारे एक आठवडय़ानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. मी अध्यक्षपदी राहणार की नाही हे वेळच ठरविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्वतः ट्रम्प आणि त्यांच्या प्रचारपथकाने मतदान आणि मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप करून अनेक तक्रारी नोंदविल्याच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचे ठरते.
पहिल्यांदाच ट्रम्प यांनी या मुद्दय़ावर नरमाईची भूमिका घेतली आहे. निकाल स्पष्ट झाला असला तरीही ट्रम्प यांनी लोकशाहीच्या प्रक्रियेंतर्गत पराभव मान्य करून परपंरेचे पालन करत ज्यो बायडेन यांना विजयाच्या शुभेच्छा देण्याचे संकेत अद्याप दिलेले नाहीत.
टाळेबंदी नाही
युरोपयी देश आणि ब्रिटनमध्ये संक्रमण वाढले असता कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु ट्रम्प यांनी अमेरिकेत टाळेबंदी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. टाळेबंदीची कुठलीच गरज नाही, काही आठवडय़ांमध्ये लस आमच्याकडे असेल आणि यासंबंधी सर्व तयारी करण्यात आली आहे. भविष्यात सर्वकाही सुरळीत होईल अशी अपेक्षा करतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
पुढील घडामोडी
पुढील महिन्यात इलेक्टोरल कॉलेजची बैठक होणार आहे. त्यापूर्वी ट्रम्प यांना पराभव मान्य करावा लागणार आहे. कारण बायडेन आता एरिझोना आणि जॉर्जियामध्ये विजयी होत 290 मतांपर्यंत पोहोचले आहेत. 8 डिसेंबर रोजी इलेक्टोरल मीट तर 14 रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करावी लागणर आहे. ट्रम्प लवकरच बायडेन यांना विजयाच्या शुभेच्छा देऊन व्हाइट हाउसचा निरोप घेण्याची तयारी करतील, असे मानले जात आहे.