कोरोनाविरोधात योगी सरकारची तयारी : युनिसेफकडून राज्याला होतेय मदत
देशात कोरोना लसीची अद्याप चाचणी सुरू असली तरीही योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने एक पाऊल पुढे टाकत त्याच्या स्टोरेज आणि कोल्ड चेनच्या निर्मितीवर काम सुरू केले आहे. यांतर्गत सर्व जिल्हय़ांमध्ये लसीच्या संग्रहासाठी जागाही शोधण्यात आली आहे. यात 22 जिल्हय़ांमध्ये उपयुक्त ठिकाण नव्हते, तेथे आता निर्मितीकार्य सुरू करण्यात आले आहे. 4 कोटी लसीचे डोस ठेवण्याची तयारी आहे.
लसीचा संग्रह करण्यासाठी 1600 उपकरणे मागविली जाणार आहेत. कोरोनाची लस ठेवण्यासाठी विशेष तापमानाची गरज असते. याकरता वेगळे स्टोरेज कक्ष निर्माण केले जाते आणि डीन फ्रीजर आणि आइसलाइन रेफ्रिजरेटरमध्ये त्यांना ठेवण्यात येते. राज्यात याच्या मूल्यांकनासाठी सरकारने युनिसेफचे सहकार्य घेतले आहे.
1600 उपकरणे मागविणार
जिल्हय़ांमध्ये किती उपकरणे हवीत याचे मूल्यांकन करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशात सध्या 3,500 उपकरणे असून 1600 नवी उपकरणे मागविण्यासाठी यादी तयार करण्यात आली आहे. लसीची कोल्ड चेन राखून ती सुरक्षित ठेवण्याचे कार्य सुरू आहे.
4 कोटी डोसची तयारी
युनिसेफचे उत्तरप्रदेश आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल्ल भारद्वाज उपकरण आणि कक्षनिर्मितीच्या मूल्यांकनाची जबाबदारी सांभाळत आहेत. उत्तरप्रदेशात 4 स्तरीय कोल्ड चेन असणार आहे. एक प्रादेशिक स्टोअर त्यानंतर 9 विभागांमध्ये प्रत्येकी एक विभागीय कक्ष, त्यानंतर प्रत्येक जिल्हय़ात एक साठवणूक कक्ष तसेच प्रत्येक तालुक्यात कक्ष असणार आहे. साठवणूक कक्ष नसलेल्या जिल्हय़ांमध्ये त्यांची निर्मिती करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पहिल्या खेपीत 4 कोटी डोस मिळण्याची अपेक्षा असून त्यानुसारच तयारी होतेय, लसीकरण प्रक्रियेत कोल्डचेन महत्त्वाची ठरणार आहे. लसीकरण मोठय़ा प्रमाणात होत असताना उन्हाळा सुरू झालेला असेल. अशा स्थितीत कोल्ड चेनच लस सुरक्षित ठेवू शकते. एकही लस खराब होऊ नये, कारण एक लस एक जीव वाचवू शकते असे डॉ. भारद्वाज यांनी म्हटले आहे.
डाटा तयार
एनएचएमच्या मिशन संचालिका अपर्णा उपाध्याय यांनी उत्तरप्रदेशात सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. सुमारे 7.5 लाख आरोग्य कर्मचारी हे सरकारी तसेच खासगी क्षेत्रात कार्यरत आहेत. यात डॉक्टरांपासून स्वच्छता कर्मचारीही सामील आहेत. यातील 5.5 लाख जणांचा डाटा तयार करण्यात आला आहे. त्यांच्यानंतर 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना लस देण्यात येणार आहे.