केवळ एका फ्लॅटमधून 47 हजार लंपास
प्रतिनिधी/ खेड
शहरातील डाकबंगला येथे चोरटय़ांनी एकाच रात्री 4 फ्लॅट फोडून पोलिसांची झोप उडवली आहे. यापैकी तीन फ्लॅटमध्ये हाती काहीही लागले नसले तरी एका फ्लॅटमधून 47 हजाराची रोकड चोरटय़ांनी लांबवल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुरूवारी सायंकाळी उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.
शहरातील मध्यवर्ती असलेल्या डाकबंगला परिसरात चोरटय़ांनी बुधवारी रात्री डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. गुरूवारी सकाळी फ्लॅट फोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित मालकांना धक्का बसला. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. एका फ्लॅटमधून 47 हजाराची रोकड चोरटय़ांच्या हाती लागली. मात्र अन्य फ्लॅटमधून रिकाम्या हातीच परतावे लागले.
या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात सायंकाळी उशिरा अज्ञात चोरटय़ांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपावलाच्या सुटीत अनेक फ्लॅट बंद असल्याची संधी साधून चोरटे डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाच दिवशी चार फ्लॅट फोडून चोरटय़ांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. सोसायटी व फ्लॅटच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, असे आवाहन नगर परिषदेने ध्वनीवर्धकाद्वारे केले आहे.