सांगरूळ / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण क्षेत्रात असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी मी पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून महाविकास आघाडी मधून आपला प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवीत असून मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी केले. कुडित्रे (ता. करवीर ) येथील डी सी नरके विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य बी आर अकिवाटे हे होते .
यावेळी बोलताना प्रा.आसगावकर यांनी राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण, २००५ नंतर नेमणूक झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना, अघोषित शाळांचे अनुदान, शिक्षक कर्मचारी भरतीवरील बंदी ,संच मान्यतामधील त्रुटी , नैसर्गिक वाढीने शाळांना शंभर टक्के अनुदान , डी सी पी एस सेवकांचे प्रश्न,शाळांचे वेतनेतर अनुदान ,शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावणे ,शिक्षण क्षेत्रात अनुकंपा भरती तत्काळ सुरू करणे ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण देणे यासारखे अनेक प्रश्न राज्याच्या शिक्षण क्षेत्रात आहेत .शिक्षण क्षेत्रातील या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक रिंगणात आहे .राज्यात सध्या सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार व आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या सहकार्याने व पाठबळावर मी या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वचन बद्ध आहे . माझ्या नावासमोर पसंती क्रमांक एक लिहून मला मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा असे आवाहन प्रा . जयंत आसगावकर यांनी यावेळी केले .
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य बी आर अकीवाटे यांनी प्रा .जयंत आसगावकर यांचे शिक्षण क्षेत्रातील काम चांगले असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. सुरुवातीस स्वागत कोजिमाशी पतसंस्थेचे संचालक के एस खाडे यांनी केले.
प्रास्ताविक करताना प्रा . बी .डी . लोंढे यांनी प्रा जयंत आसगावकर गेली ३१ वर्षे ग्रामीण भागातील कुडित्रे येथील श्रीराम ज्युनियर कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहेत .असे कणखर नेतृत्व असलेले प्रा. आसगावकर यांना आपले सर्वांचे प्रतिनिधी म्हणून विधानपरिषदेत पाठवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करूया असे आवाहन केले . यावेळी , प्रा. व्ही एस हतगिणे , प्रा.डी. बी .गायकर, ए एम पाटील ,एस एम लाड, कृती समितीचे के एम मुसळे यांचेसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . आभार बी व्ही माळी यांनी मानले .