वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या न्यूझीलंडच्या दौऱयावर गेलेल्या पाक क्रिकेट संघातील आणखी तीन क्रिकेटपटू कोरोनाबाधित आढळले आहेत. आता पाकच्या एकूण 10 क्रिकेटपटूंना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाची दुसरी चाचणी घेण्यात आली असून आणखी एका चाचणीचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाबाधित प्रकरणांची सखोल चौकशी चालू आहे. ख्राईस्टचर्चमध्ये सहाव्या दिवशी पाक चमूतील एकूण 46 सदस्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली नाही. यापैकी 42 सदस्यांची पुढील चाचणीही निगेटिव्ह आली आहे. तिघा जणांचा कोरोना इतिहास तपासण्यात येत आहे, तर एका व्यक्तीची चाचणी अद्याप बाकी असल्याचे न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयातर्फे मंगळवारी सांगण्यात आले. पाक संघाला सरावापासून बंदीच्या नियमामुळे वंचित व्हावे लागले आहे. पाक चमूतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सरावाचा धोका पत्करणे अयोग्य असल्याचे सांगण्यात आले. कॅन्टरबरीच्या वैद्यकीय अधिकाऱयांच्या अहवालानंतरच पाक संघातील खेळाडूंच्या सरावाला परवानगी दिली जाईल.
पाकचा संघ 24 नोव्हेंबरला न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. पहिल्या कसोटीपूर्वी तिसऱया चाचणीमध्ये पाक संघातील सात क्रिकेटपटू कोरोनाबाधित आढळल्याने त्यांना क्वारंटाईनमध्ये 14 दिवसांसाठी पाठविण्यात आले आहे. येत्या रविवारी पाक संघाची शेवटची कोरोना चाचणी होणार आहे. न्यूझीलंड आणि पाक यांच्यातील टी-20 मालिका 18 डिसेंबरपासून सुरू होईल. पण त्याआधी पाक संघ 10 डिसेंबरपासून सराव सामने खेळणार आहे.