पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे आवाहन
प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यातील सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना माहितच आहे की, दिनांक 10 डिसेंबर रोजी पासून नरभक्षक बिबट्याचे वास्तव्य सांगवी नं. 3, बिटरगाव (वांगी), वांगी नं. 4, ढोकरी, भिलारवाडी या वांगी गावाच्या परिसरातील गावांमध्ये मिळून आले आहे. तरीदेखील दि. 13 व दि 14 डिसेंबर रोजी वरील गावाच्या शिवारात बिबट्याला प्रत्यक्षात कोणी पाहिले नाही किंवा त्याचे ठसे मिळून आले नाहीत. या भागात आलेला बिबट्या हा सतत पुढे व शक्यतो दक्षिणेकडे प्रवास करणारा प्राणी असून तो पैठण, जिल्हा औरंगाबाद येथून दक्षिण दिशेने प्रवास करत करमाळा तालुक्यात व वांगी परिसरातील गावात आल्याचे स्पष्ट दिसून येते. परंतु, वरील पाच-सहा गावाच्या दक्षिणेला व पूर्वेला उजनी जलाशयाचे पाणी असल्याने बिबट्या पुढे जाऊ शकला नाही. त्याचे वास्तव्य आढळून आले नसल्याने वांगी नं. 1 गावाच्या पूर्वेला पांगरे व सांगवी गावाच्या दरम्यान असलेल्या ओढ्यावरील बंधार्यावरून त्याने पांगरे व सांगवी गावाच्या शिवारात प्रवेश केला असण्याची दाट शक्यता आहे. तेथून पुढे तो कविटगाव, सांगवी नं. 1, बिटरगाव (सांगवी) व कंदर गावाच्या शिवारात जाऊ शकतो. बिबट्या सध्या वांगी परिसरात आहे असे समजून वर नमूद केलेल्या गावातील लोक निष्काळजीपणे त्यांच्या शिवारात एकटे-दुकटे फिरण्याची शक्यता असल्याने त्यांना हा सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. तरी वर नमूद केलेल्या गावातील लोकांनी अतिशय दक्ष राहावे व बिबट्यापासून संरक्षण करण्याच्या सर्व सूचनांचे पालन करावे.
जोपर्यंत बिबट्याचे वास्तव्य पुढील गावात आढळून येत नाही तोपर्यंत वांगी परिसरातील सांगवी नं. 3, बिटरगाव (वांगी), वांगी नं. 4, ढोकरी, भिलारवाडी, वांगी नं. 3, वांगी नं.1 व शेलगाव (वांगी) ग्रामस्थांनी देखील अत्यंत दक्ष राहावे. विशेषता केळीच्या बागेमध्ये काम करणाऱ्या कामगारांची व मजुरांची केळीच्या बाग मालकांनी व व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहनही पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी केले आहे.