वृत्तसंस्था/ जिनेव्हा
फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लॅटर यांनी झुरिचमध्ये फुटबॉल म्युझियमची स्थापना करताना मोठा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचे दिसून आल्याने फिफाने त्यांच्याविरूद्ध फौजदारी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी फिफाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.
ब्लॅटर यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीमध्ये झुरिचमध्ये फुटबॉल म्युझियमची स्थापना करण्याकरिता विविध कंपन्यांची नियुक्ती ब्लॅटर यांनी स्वत: केली होती. फुटबॉल म्युझियमच्या प्रोजेक्टमध्ये जुन्या इमारतीचे नूतनीकरण करत या इमारतीतील काही भाग भाडेतत्त्वावर दिला होता. 2016 साली फिफाच्या विश्व फुटबॉल म्युझियमचे उद्घाटन करण्यात आले होते. 1970 च्या दशकात बांधलेल्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी आणि 34 अपार्टमेंटसाठी 140 दशलक्ष डॉलर्सची रक्कम खर्च करण्यात आली होती. ब्लॅटर यांनी फुटबॉल म्युझियमच्या इमारतीमधील या 34 अपार्टमेंटच्या नूतनीकरणासाठी बराच निधी खर्च दाखविला होता. हे फुटबॉल म्युझियम 2015 च्या मे महिन्यात सज्ज करण्यात येणार होते पण त्यावेळी ब्लॅटर यांची पाचव्यांदा फिफाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर फुटबॉल म्युझियमच्या कामाला विलंब झाला. अमेरिकन आणि स्वीसच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल अधिकाऱयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. फिफाने आता या प्रकरणी ब्लॅटर यांच्याविरूद्ध फौजदारी तक्रार अधिकृतपणे नोंदविली आहे.