प्रतिनिधी / खेड
नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांची लक्षणीय संख्या लक्षात घेवून कोकण मार्गावर साप्ताहिक सुपरफास्ट गाड्यांची खैरात सुरूच आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना उसळणारी गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी ३० डिसेंबरपासून उधना (सुरत) मडगाव सुपरफास्ट फेस्टीवल साप्ताहिक स्पेशल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाताळसाठी आलेल्या पर्यटकांच्या परतीच्या प्रवासासह नववर्ष स्वागतासाठी रेल्वेगाड्यांना उसळणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने पूर्णपणे आरक्षित असणारी २२ डब्यांची फेस्टीवल स्पेशल कोकण मार्गावर धावणार आहे. ३० डिसेंबर रोजी बुधवारी व १ जानेवारी रोजी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता उधना येथून सुटून दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी ९.३० वाजता मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात ३१ डिसेंबर रोजी गुरूवारी व २ जानेवारी रोजी मडगाव येथून सकाळी १२ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता उधना येथे पोहचेल. वसईमार्गे धावणाऱ्या या गाडीला कोकण मार्गावर पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
तीन गाड्यांना जानेवारीपर्यंत मुदतवाढ
कोरोना नियंत्रणात आल्यानंतर कोकण मार्गावर चालवण्यात आलेल्या एर्नाकुलम-ओखा, लोकमान्य टिळक-मंगळूर, दादर-तिरुनेलवेली या सुपरफास्ट फेस्टीवल गाड्यांना जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एर्नाकुलम-ओखा १ ते २९ जानेवारी दरम्यान दर शुक्रवारी व बुधवारी धावेल. मंगळूर-लोकमान्य टिळक १ ते ३१ जानेवारीदरम्यान नियमितपणे धावेल. तिरुनेलवेली-दादर सुपरफास्ट स्पेशल ६ ते २७ जानेवारीपर्यंत धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.