जागतिक- देशातील बाजारांचा प्रभाव : बँकांचे समभाग मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक आणि देशातील बाजारातील सकारात्मक संकेतामुळे शेअर बाजाराने मंगळवारी सलग पाच दिवस तेजी कायम राखत मजबूत स्थिती प्राप्त केली आहे. दिवसभरात तेजीचे नवे उच्चांक गाठणारा शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दिवसअखेर 259.33 अंकांनी वधारुन 47,613.08 वर बंद झाला आहे. ट्रेडिंगच्या दरम्यान सेन्सेक्सने आपला सर्वोच्च 47,714.55 इतका टप्पा ही गाठला होता. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीने 59.40 अंकांच्या वधारासह 13,932.60 ची पातळी गाठली आहे. दिवसभरातील कामगिरी दरम्यान निफ्टीने 13,967.60 चा उच्चांक प्राप्त केला होता.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक, टेक महिंद्रा, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक आणि आयटीसी यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, एनटीपीसी, पॉवरग्रिड, डॉ. रेड्डीज लॅब, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
अमेरिकेने कोरोना रोखण्यासाठी भक्कम पॅकेज घोषित केल्यानंतर जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली. त्यामुळे आशियाई बाजारांसह अन्य शेअर बाजार तेजीसह बंद झाले आहेत. याचदरम्यान जागतिक बेंचमार्क बेंट कच्चे तेल वायदा बाजारात 0.88 टक्क्यांनी वधारुन 51.40 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे.
विदेशी गुंतवणुकीचा प्रवास हा मागील काही महिन्यापासून सकारात्मक राहिलेला आहे. याचाच एक भाग म्हणून चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी निव्वळ स्वरुपात 1,588.93 कोटी रुपयाचे समभाग खरेदी केले असल्याने शेअर बाजाराने मजबूत स्थिती प्राप्त केल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. तथापि, अद्यापही शेअरबाजारांना कोरोनाच्या नव्या रूपाची धास्ती सतावत असल्याचे जाणवत आहे.
कोरोनाचा प्रभावाची धास्ती
कोरोना विषाणूचा नव्याने आढळलेल्या प्रकारामुळे पुन्हा एकदा जागतिक पातळीवरील सरकारी यंत्रणा जागृत झाल्या आहेत. यामुळे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जगासोबत देशातील गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण राहणार असल्याचे संकेतही शेअर बाजार अभ्यासकांनी यादरम्यान व्यक्त केले आहेत.