राजापूर-धोपेश्वर खंडेवाडीतील प्रकार
वार्ताहर राजापूर
शहरालगतच्या धोपेश्वर-खंडेवाडी येथे एक रिक्षा व तीन दुचाकी अशी 4 वाहने आगीत जळून खाक झाली. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले. अज्ञाताने जाणूनबुजून गाडय़ांना आग लावल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खंडेवाडी येथील रमेश खंडे यांच्या दोन दुचाकी व त्यांचे भाऊ अविनाश खंडे यांची रिक्षा व एक दुचाकी अशी चार वाहने त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यालगतच्या शेडमध्ये पार्क करून ठेवलेली असतात. सोमवारी मध्यरात्री खंडे यांच्या घरातील सर्व मंडळी झोपलेली असताना शेडमध्ये लावलेल्या गाडय़ांना अचानक आग लागली. रात्री 12.30 च्या दरम्यान या शेडलगत राहणाऱया बांदिवडेकर कुटुंबियांच्या ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर रूपेश बांदिवडेकर, प्रसन्न बांदिवडेकर यांच्यासह बांदिवडेकर कुटुंबातील सर्वांनी तत्काळ धाव घेत पाणी मारून आग आटेक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान खंडे कुटुंबालाही या बाबत माहिती देण्यात आली. खंडे कुटुंबियांनीही धाव घेत आग आटेक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येईपर्यंत सर्व वाहने जळून खाक झाली होती. या आगीत 3 दुचाकी व रिक्षा अशा चारही गाडय़ा जळून खाक झाल्याने खंडे यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. या बाबत खंडे यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान अज्ञाताने जाणूनबुजून गाडय़ा जाळल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनाही तसा संशय असून त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.