मागील वर्षापेक्षा प्रमाण राहिले कमी
नवी दिल्ली
देशात लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा सध्या जोर धरू लागला आहे. अशा पार्श्वभूमीत नववर्षाच्या पहिल्या दिनी पूर्ण जगात सर्वाधिक मुले भारतातच जन्मली आहेत. भारतात 1 जानेवारी रोजी सर्वाधिक 60,000 मुलांनी जन्म घेतला आहे. कुठल्याही अन्य देशाच्या तुलनेत हे प्रमाण खूपच अधिक आहे. परंतु 2020 सालच्या तुलनेत हा आकडा 7,390 ने कमी आहे.
युनिसेफच्या अनुमानानुसार 1 जानेवारी रोजी चीनमध्ये 35,615 मुलांनी जन्म घेतला आहे. मुलांच्या जन्माप्रकरणी चीन यंदा दुसऱया स्थानावर राहिला आहे. 1 जानेवारी रोजी जगभरात 3,71,504 मुलांनी जन्म घेतल्याचा युनिसेफचा अनुमान आहे. यातील 52 टक्के जन्म केवळ 10 देशांमध्येच झाले आहेत. भारतात 59,999 आणि नायजेरियात 21,439 तर पाकिस्तानात 14,161 मुलांनी जन्म घेतला आहे. इंडोनेशियात हा आकडा 12,336 तर इथियोपियात 12,006 आणि अमेरिकेत 10,312 राहिला आहे. इजिप्तमध्ये 9,455 आणि बांगलादेशात 9,236 आणि कांगो प्रजासत्ताकमध्ये 8,640 मुलांचा जन्म झाला आहे. 2021 या वर्षात 140 दशलक्ष मुलांचा जन्म होणार असून त्यांचे सरासरी वय 84 वर्षे राहणार असल्याचा अनुमान आहे. 1 जानेवारी रोजी जन्म घेणारे मूल एक वर्षापूर्वीच्या मुलांच्या तुलनेत जगात अधिक काळ जगणार आहे. नवे वर्ष पुन्हा नव्या संधी घेऊन आल्याचे युनिसेफचे कार्यकारी संचालक हेन्रीटा फोर यांनी म्हटले आहे. मुलांसाठी एक निष्पक्ष, सुरक्षित आणि तंदुरुस्त जग निर्माण करण्यासाठी 2021 मध्ये प्रयत्न व्हावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. भारतात 2021 मध्ये जन्म घेणाऱया नवजातांचे सरासरी वय 809 वर्षे राहणार असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. विशेष नवजात शिशू देखभाल केंद्रांच्या स्थापनेत सरकारच्या सहभागामुळे देशात दरदिनी अतिरिक्त 1000 नवजातांना वाचविण्यास मदत मिळाली आहे. देशात लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला असला तरीही त्यात अधिक सुधारणांचा वाव आहे.