सदाशिवगड येथे पं. बाबुराव बानावळी-पं. विश्वनाथ गडकर स्मृती संगीत संमेलन उत्साहात
प्रतिनिधी/ कारवार
तालुक्यातील सदाशिवगड येथे पंडित बाबुराव बानावळी आणि पंडित विश्वनाथ गडकर चोवीसावे स्मृती संगीत संमेलन उत्साहात पार पडले. भारतीय संगीताच्या प्रचारासाठी वाहून घेतलेल्या सदाशिवगड येथील पं. बानावळी व पं. गडकर संगीत प्रतिष्ठानतर्फे ‘महामाया देवस्थानच्या सभागृहात आयोजित केलेल्या संमेलनाचे उद्घाटन येथील बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सुजीतकुमार सतपती यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले.
याप्रसंगी बोलताना सतपती म्हणाले, भारतीय संगीताला महान इतिहास आणि उज्ज्वल परंपरा लाभली नाही. वेगवेगळय़ा कारणामुळे आजची पिढी भारतीय संगीताकडे अपेक्षित प्रमाणात खेचली जात नाही, असे दृश्य दिसून येत आहे. अशा परिस्थितीही सदाशिवगडसारख्या ग्रामीण प्रदेशात गेली 24 वर्षे संगीत संमेलनाचे यशस्वीरित्या आयोजन करून प्रतिष्ठानने मोठे कार्य केले आहे. पुढील वर्ष संमेलनाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. ते मोठय़ा दिमाखात साजरे झाले पाहिजे. त्याकरिता प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱयांनी व सदस्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. उद्घाटनावेळी व्यासपीठावर इलेक्ट्रिकल ठेकेदार उल्हास राणे, निवृत्त प्राचार्य पी. के. चापगावकर, वर्षा पावसकर उपस्थित होत्या.
तबला सहवादन
संमेलनाच्या पहिल्या सत्रात सुप्रसिद्ध तबलावादक चंद्रकांत गडकर त्यांचे शिष्य प्रथमेश गडकर, विराज गडकर, साईकिरण नाईक, नारायण सैल, सुमन देवाडिगा आणि राजेश सैल यांच्या बहारदार तबला वादनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुसऱया सत्रात कुमठा येथील रेश्मा भट आणि रम्या भट यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. अखेरच्या सत्रात धारवाड येथील पंडित निसार अहमद यांचा तबला वादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी तबल्यावर चंद्रकांत गडकर यांनी तर हार्मोनियमवर दत्तराज मालसी (गोवा) यांनी साथसंगत केली.
कलाकारांचा सत्कार
प्रत्येक संमेलनावेळी कलेसाठी जीवन समर्पित केलेल्या गुणी कलाकारांचा सत्कार करण्याची परंपरा प्रतिष्ठानने जपली आहे. यावर्षी प्रेमानंद गडकर आणि रमेश गझीनकर या ज्येष्ठ कलाकारांचा पं. निसार अहमद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संमेलनाची सुरुवात स्फूर्ती बांदेकर हिने सादर केलेल्या सरस्वती वंदनेने करण्यात आली. यावेळी गेल्या एक वर्षात निधन झालेल्या कलकारांना प्रतिष्ठानतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि नाटय़कर्मी प्रसाद मडकईकर यांनी प्रास्ताविक भाषण आणि उपस्थितांचे स्वागत केले. चंद्रकांत गडकर यांनी आभार मानले. ओंकार कुलकर्णी (गोवा) यांनी निवेदनाची बाजू उत्कृष्टरित्या सांभाळली. कोविड नियमांचे पालन करून आयोजिलेल्या या संगीत सोहळय़ाला संगीतपेमींनी भरभरून प्रतिसाद दिला.