वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक गावचे सुपुत्र व शिक्षणप्रेमी शिवाजी कल्लाप्पा हुरुडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून मराठी प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करून आपल्या भावी शैक्षणिक जीवनामध्ये यशाचे शिखर गाठण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष मोहन भैरटकर होते. प्रास्ताविकमध्ये मुख्याध्यापक शहापूरकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून शिवाजी हुरुडे यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेच्यावतीने स्वागत करण्यात आले.
वृद्धापपेन्शन शाळेसाठी
शिवाजी हुरुडे यांनी आपल्याला मिळणारी वृद्धाप काळातील पेन्शन शाळेतील विद्यार्थ्यांच्या शालोपयोगी वस्तूंसाठी यापूर्वीही दिलेली आहे, यापुढेही ते देत राहणार आहेत. शिक्षणामध्ये यशाचे शिखर गाठून आपल्या शाळेबरोबर गावचेही नाव उज्ज्वल करता येते, असे त्यांनी तरुण भारतशी बोलताना मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळा सुधारणा समितीचे सदस्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सहशिक्षक यु. पी. चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक सरोडकर यांनी आभार मानले.