पाकिस्तानी सैन्याच्या जनरलची कबुली – ड्रगनला सीपीईसीची चिंता
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या राजकारणापासून सर्वसामान्यांच्या जीवनावर चीनने कशाप्रकारे नियंत्रण मिळविले आहे, याचा खुलासा पाकिस्तानी सैन्याच्या एका विधानातून झाला आहे. बलुचिस्तानचा स्वातंत्र्यलढा दडपण्यात चीनची भूमिका असल्याचे म्हणत या अधिकाऱयाने खळबळ उडविली आहे. चीनने बलूचांचा लढा दडपून टाकण्यासाठी पाकिस्तानला 6 महिन्यांची मुदत दिली असल्याचे या सैन्याधिकाऱयाने सांगितले आहे.
बलूच आंदोलन दडपण्यासाठी क्षेत्रात मला तैनात करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी सैन्याचे मेजर जनरल अयमान बिलाल यांनी सांगितले आहे. इराण हा पाकिस्तानचा सर्वात मोठा शत्रू आहे. पाक सैन्य इराणमध्ये घुसून कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
चीनकडून मोठे वेतन
चीनकडून मला वेतन आणि मोठी रक्कम देण्यात आली आहे. अधिकृत स्वरुपात क्षेत्रीय हितसंबंधांसाठी येथे तैनात करण्यात आले आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक पट्टय़ाविरोधातील (सीपीईसी) इराणचा कट हाणून पाडण्याचा यामागे उद्देश असल्याचे बिलाल म्हणाले.
गरीब बलूचांचे शोषण
पाकिस्तानने बलुचिस्तानातील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट चालविली आहे. पाकिस्तानातील हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला भाग अत्यंत दारिद्रय़ भोगत आहे. बलुचिस्तानातील ग्वादार बंदरापर्यंत सीपीईसी प्रकल्प राबविण्यात येत आहे. पण बलुचिस्तानातील लोक चीनच्या हस्तक्षेपाला विरोध करत आहेत. बलूचांची आक्रमक भूमिका आणि हल्ल्यांमुळे या प्रकल्पाला नुकसान होत आहे. चिनी अधिकारी आणि कामगारांवरही हल्ले करण्यात येत आहेत.
चीन, पाकसाठी महत्त्वपूर्ण
चीन आणि पाकिस्तानसाठी सीपीईसीचे यश आणि बलूच आंदोलन संपणे अत्यंत आवश्यक असल्याचे बिलाल यांनी सांगितले आहे. बलूच आंदोलन दडपण्यासाठी मोठी रक्कम मिळाली आहे. इराणला बलुचिस्तानात अशांतता फैलावण्याची संधी दिली जाऊ शकत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सीपीईसीच्या माध्यमातून चीन पाकिस्तानसोबत मध्य तसेच दक्षिण आशियात स्वतःचा प्रभाव निर्माण करून अमेरिका आणि भारतासमोर नवे आव्हान निर्माण करू पाहत आहे.