ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बिग बॉस शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले स्वामी ओम यांचे आज निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वामी ओम यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासूनच ते प्रकृती अस्वास्थाने त्रस्त होते. दरम्यान, स्वामी ओम 2017 मध्ये बिग बॉसमध्ये दिसून आले होते. या सीझनमध्ये त्यांच्यामुळे अनेक वाद झाले होते. तसेच अनेकदा स्वामी ओम यांनी बिग बॉसच्या घरात आपल्या मर्यादाही ओलांडल्या होत्या. त्यांनी बिग बॉसच्या 10 व्या सीझनमध्ये प्रतिस्पर्धी रोहम मेहरा आणि बानी यांच्या अंगावर मूत्र फेकले होते. यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले होते.
स्वामी ओम यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्ली लोकसभेसाठी निवडणुकही लढवली होती. ते म्हणाले होते की, ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हिंदू विरोधी विचारांविरोधा निवडणूक लढत आहेत.