रावळपिंडी : कर्णधार बाबर आझम व फवाद आलम यांनी अभेद्य शतकी भागीदारी करीत डाव सावरल्यामुळे पाकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी 3 बाद 145 धावांपर्यंत मजल मारता आली.
ही कसोटी जिंकून मालिका एकतर्फी जिंकण्याच्या इरादा ठेवत बाबर आझमने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पण त्यांच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. द.आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने पहिले यश मिळवून देताना इम्रान बटला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. पाकने यावेळी 21 धावा जमविल्या होत्या तर बटने 15 धावा जमविल्या. याच धावसंख्येवर केशव महाराजने अझहर अलीला शून्यावर पायचीत केल्यानंतर ऍन्रिच नॉर्त्जेने अबिद अलीला (6) झेलबाद केल्यावर पाकची स्थिती 3 बाद 22 अशी बिकट बनली. शॉर्टलेगवर मार्करमने सूर मारत अबिद अलीचा एकहाती अप्रतिम झेल टिपला. मात्र बाबर व फवाद यांनी आणखी पडझड होऊ न देता डाव सावरणारी शतकी भागीदारी केली. बाबर दिवसअखेर 77 व फवाद आलम 42 धावांवर खेळत होते. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी 123 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.
दरम्यान, द.आफ्रिकेचा दुसरा स्पिनर जॉर्ज लिंडेने 2.5 षटके गोलंदाजी केल्यानंतर त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या बोटाचे स्कॅन करण्यात आले असून प्रॅक्चर झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र कसोटीच्या उर्वरित भागात तो गोलंदाजी करू शकणार नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हा मोठा धक्का ठरला आहे. दुसऱया सत्रात पावसास सुरुवात झाल्याने चहापान लवकर उरकण्यात आले. पण संततधार सुरूच राहिल्याने शेवटच्या पूर्ण सत्रात खेळ होऊ शकला नाही. पाकिस्तानने या सामन्यात विजयी संघच कायम ठेवला तर दक्षिण आफ्रिकेने लुंगी एन्गिडीच्या जागी अष्टपैलू विआन मुल्डरला अंतिम संघात स्थान दिले.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान प.डाव 58 षटकांत 3 बाद 145 : इम्रान बट 15, अबिद अली 6, अझहर अली 0, बाबर आझम खेळत आहे 77 (125 चेंडूत 12 चौकार), फवाद आलम खेळत आहे 42 (138 चेंडूत 5 चौकार), अवांतर 5. गोलंदाजी : केशव महाराज 2-51, नॉर्त्जे 1-30, रबाडा 0-36, मुल्डर 0-18.