वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
बीबीसीतर्फे वर्षातील सर्वोत्तम भारतीय महिला क्रीडापटूच्या पुरस्कारासाठी ओदिशाची महिला धावपटू दुती चंदच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दुती चंदचे खास अभिनंदन केले आहे.
2021 सालातील बीबीसीच्या सर्वोत्तम महिला क्रीडापटू पुरस्कारासाठी दुती चंदची शिफारस करण्यात आली आहे. ओडिशा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष निरंजन पटनाईक यांनीही दुती चंदचे खास अभिनंदन केले आहे. 25 वर्षीय दुती चंद ही दक्षिण आशियातील 100 मी. धावण्याच्या शर्यतीतील सर्वात वेगवान धावपटू आहे. या पुरस्कारासाठी नेमबाज मनू भाकर, बुद्धिबळपटू कोनेरू हंपी, महिला मल्ल विनेश फोगट आणि भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी यांची शिफारस करण्यात आली आहे. 8 मार्च रोजी सर्वोत्तम महिला क्रीडापटूची घोषणा केली जाणार आहे.