ऑनलाईन टीम / पुणे :
वीजग्राहकांना सार्वजनिक सुटीच्या दिवशी थकबाकी व वीजबिलांचा भरणा करता यावा यासाठी महावितरणचे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र फेब्रुवारी महिन्यातील सर्व सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भात प्रादेशिक कार्यालयातून सर्व कार्यालयांना निर्देश देण्यात आले आहे.
महावितरणवरील आर्थिक संकट अतिशय गंभीर असल्याने थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून आवाहन करण्यात येत आहे. सोबतच नोटीसेस पाठवून व प्रत्यक्ष संपर्क साधून वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील वीजग्राहकांच्या सोयीसाठी फेब्रुवारी महिन्यातील सर्व शनिवार व रविवारसह इतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी देखील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.
याशिवाय घरबसल्या थकबाकी व वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल ॲपची सेवा उपलब्ध आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी घरबसल्या ‘ऑनलाईन’ सेवा तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी देखील सुरु असलेले वीजबिल भरणा केंद्र उपलब्ध आहेत. वीजग्राहकांनी थकबाकीसह वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.