गॅस सिलिंडर दरात 50 रुपयांनी वाढ, पेट्रोल-डिझेलचा भडकाही सुरूच
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली असतानाच दुसरीकडे आता आणखी एक मोठा झटका नागरिकांना बसला आहे. इंधन दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या दरात सोमवारपासून 50 रुपयांनी वाढ केल्यामुळे ग्राहकांना 14 किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी 769 रुपये मोजावे लागणार आहेत. सोमवारी दुपारी 12 वाजल्यापासून नवे दर लागू झाले.
फेब्रुवारी महिन्यात दुसऱयांदा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाली होती. सिलिंडरची किंमत 694 रुपयांवरून 719 रुपये करण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी 50 रुपयांची वाढ केल्यामुळे प्रतिसिलिंडर दर 769 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. आता घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही वाढ झाली आहे.
सिलिंडरच्या दरात डिसेंबर 2020 पासून तिसऱयांदा वाढ झाली आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूपासून एलपीजी वायू बनवला जातो. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याला समीक्षा करून ठरवत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीवर आणि अमेरिकन डॉलर रुपयांच्या एक्स्चेंज किंमतीनुसार दरांमध्ये चढ-उतार हेत असतात.
पेट्रोल-डिझेल दर वाढता वाढता वाढे
नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे भावही गगनाला भिडले आहेत. देशात पेट्रोल डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोलच्या दरात 26 पैशांनी, तर डिझेलच्या दरात 30 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर 95.46 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 86.35 रुपयांवर पोहेचले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस अशीच वाढ सुरू राहिली तर इंधनाचे दर लवकरच शंभरी गाठण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे इंधन दरवाढ होताना दिसत आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवरही परिणाम
नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी नवी ऊंची गाठली आहे. यामुळे महागाई भडकण्याची चिन्हे आहेत. विशेषकरून डिझेलचे दर वाढल्याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होतो. यामुळे शेतकऱयांचा सिंचन खर्च वाढतो आणि वाहतूक भाडे महागते. माल वाहतूक महागल्याने सर्वच वस्तूंचे दर वाढू शकतात. नजिकच्या काळात याचे परिणाम दिसून येऊ शकतात. सध्याच्या स्थितीत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांचा खिसा रिकामा होताना दिसतोय. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होताना दिसते.
कच्चे तेल ते पक्के इंधन…
भारताला कच्चे तेल अन्य देशांकडून आयात करावे लागते. कच्चे तेल अत्यंत स्वस्त किंमतीत मिळत असले तरी पेट्रोल-डिझेल निर्मितीपर्यंत कर व खर्च वाढत जातो. कच्चे तेल आयात केल्यानंतर ते रिफायनरीला पाठवले जाते. येथे या कच्च्या तेलामधून पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थ काढले जातात. रिफायनरीमधून हे तेल पेट्रोल आणि डिझेल विकणाऱया कंपन्यांना जाते. त्यानंतर पेट्रोलपंप मालक आपले कमिशनही वसूल करतात. इंधनाच्या किंमतीत सरकारकडून दोन प्रकारचे करदेखील जोडले जातात. केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारांचा मूल्यवर्धित करही त्यात समाविष्ट करून अंतिम किंमत ठरत असते.