क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत चेन्नईन एफसीची लढत गुरुवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होईल. चेन्नईनच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या असल्या तरी थोडीफार प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळण्याची त्यांना आशा आहे.
मागील लढतीत चेन्नईनला एफसी गोवाविरुद्ध बरोबरी साधावी लागली. त्यामुळे त्यांच्या आशा आटोपल्या. यानंतरही प्रशिक्षक क्साबा लॅसझ्लो मोसमाची विजयी सांगता करण्यास आतूर आहेत. आमचे दोन सामने बाकी आहेत. केवळ बाद फेरीचा मुद्दा नाही, तर चांगले निकाल मिळविणे आवश्यक आहे. या दोन लढतींत आम्ही जिंकण्यासाठी प्रत्येक गोष्ट करू, असे लॅसझ्लो म्हणाले.
गेल्या आयएसएल फुटबॉल मोसमात उपान्त्य फेरी गाठलेल्या चेन्नईनला यावेळी पुरेसे गोल करता आले नाहीत. लॅसझ्लो यांच्या संघाचे संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्याचे प्रमाण केवळ 5.5 टक्के आहे. त्यामुळे त्यांच्या आघाडीफळीने किती संधी दवडल्या हे स्पष्ट होते. या मोसमात आमच्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, पण एकूण चित्र चमकदार नव्हते. खास करून आघाडीफळीत कोणतीही सकारात्मक बाब नाही, असे संघाच्या मोहिमेबाबत बोलताना लॅसझ्लो म्हणाले.
नॉर्थईस्ट युनायटेडविरूद्धचा सामना अवघड असेल. नॉर्थईस्ट युनायटेडने खास करून चांगले परदेशी खेळाडू भरती केले. आमचा जिंकण्याचा प्रयत्न असेल. यशस्वी फुटबॉल खेळणे आणि गोल करण्याकडे आमचे लक्ष आहे, एफसी गोव्याविरूद्ध सामन्याप्रमाणेच आम्ही खेळू आणि हेच आमचे ध्येय आहे, असे लॅस्झलो म्हणाले. लॅसझ्लो यांचा संघ गेल्या सात सामन्यांत जिंकू शकला नाही. दुसरीकडे नॉर्थईस्टने खलीद जमील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा सामन्यांत अपराजित मालिका राखली आहे आणि त्यांचे बाद फेरीत जाण्याचे लक्ष्य आहे.
खलीद जमील यांच्याकडे सुत्रे आल्यापासून अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. चार विजय आणि दोन बरोबरी अशा कामगिरीसह या संघाने पहिल्या चार क्रमांकात स्थान मिळविले आहे, पण शेवटच्या दोन स्थानांसाठी अजूनही चार संघ शर्यतीत असल्यामुळे त्यांचे ध्येय साध्य झालेले नाही. नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रशिक्षक ऍलिसन खार्सीन्तीएव यांनी आपल्या संघाने प्रतिस्पर्ध्याला कमी लेखू नये, असे आवाहन केले. ते म्हणाले की, आम्हाला प्रतिस्पर्ध्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, तसेच आम्हाला आक्रमणासाठी मोकळीक मिळवावी लागेल. आम्हाला शांतपणे, संघटितपणे आणि एकाग्रतेने खेळून आक्रमकता दाखवावी लागेल.