पुढील बैठकीत निश्चित ठराव करू-शांताराम कुगजी यांची ग्वाही
प्रतिनिधी / येळ्ळूर
येळ्ळूर ग्राम पंचायतीची पहिलीच बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीकडे संपूर्ण सीमाभागाचे लक्ष लागून होते. सीमाप्रश्नाबाबतचा ठराव या बैठकीत मांडणार असे सांगण्यात आले होते. मात्र पहिल्या बैठकीत या ठरावाला बगल देण्यात आली आहे. याबाबत येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी यांच्याशी संपर्क साधला असता पुढील बैठकीत निश्चित सीमाप्रश्नाचा ठराव केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
येळ्ळूर ग्रा. पं.च्या पहिल्या बैठकीत गेल्या अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा ठराव मांडण्यात येतो. मागील वेळीही पहिल्याच बैठकीत ठराव मांडण्यात आला होता. त्यामुळे यावषी हा ठराव मांडणार हे निश्चित होते. मात्र पहिल्या बैठकीत हा ठराव मांडला नाही. त्यामुळे समस्त येळ्ळूरवासियांबरोबरच सीमावासियांतून नाराजी व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे म. ए. समितीचा हा लढा सीमाप्रश्नासाठीच आहे. त्यासाठीच सर्वसामान्य जनता प्रतिनिधींना बहुमतांनी निवडून देतात. मात्र पहिल्या बैठकीत ठराव न झाल्यामुळे म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पहिल्या बैठकीत गावच्या विकासासंदर्भात अनेकांनी आपली मते व्यक्त केली. गावचा विकास करून सर्व सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा झाली. पाणी, गटारी स्वच्छ करणे, रस्ते आणि समस्या सोडविण्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली.सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, महेश कानशिडे, दयानंद उघाडे, अरविंद पाटील, पिंटू चौगुले, विलास बेडरे यांच्यासह महिला सदस्यांनी एकजुटीने विकास करण्याबाबत मते मांडली.
ग्राम पंचायत पिडीओ अरुण नायक यांनी अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर यांचे स्वागत करून सत्कार केला. याचबरोबर इतर सदस्य व महिला सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.
लक्ष्मी थडगे परिसर स्वच्छता करा
येळ्ळूरच्या मध्यभागी असलेल्या लक्ष्मी थडग्याच्या परिसरामध्ये कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. याचबरोबर सर्वत्र अस्वच्छता असून हा परिसर स्वच्छ करावा, अशा मागणीचे निवेदन पहिल्याच बैठकीत ग्रा. पं. सदस्य विलास बेडरे यांनी अध्यक्ष आणि पिडीओंकडे केली. गावातील या लक्ष्मी थडगे परिसरात अनेक जण कचरा फेकत आहेत. त्याचबरोबर घाण पाणीही सोडत आहेत. त्यामुळे या परिसरातील व्यावसायिकांनी हा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी प्रमोद पाटील, रमेश मेणसे, दयानंद उघाडे यासह इतर सदस्यांनी सर्वांनी मिळून तो परिसर स्वच्छ करुया, अशी सूचना त्यांनी केली. त्यावर सर्वच सदस्यांनी होकार दिला आहे.