क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेतील रविवारी खेळविलेली केरळ ब्लास्टर्स आणि चेन्नईन एफसी यांच्यातील दुसरी लढत 1-1 अशी बरोबरीत संपली. बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर खेळविलेल्या या सामन्यात शेवटच्या दहा मिनिटांत चेन्नईन एफसीचा एक खेळाडू कमी होऊनही केरळ ब्लास्टर्सला फायदा उठविता आला नाही. या सामन्यापूर्वीच दोन्ही संघांच्या सातव्या मोसमात बाद फेरी गाठणाच्या आशा संपुष्टात आल्या होत्या.
या लढतीतील दोन्ही गोल मध्यंतरापूर्वीच झाले. चेन्नईन एफसीसाठी फातखुलो फातखुल्लोएवने गोलचे खाते उघडले तर केरळ ब्लास्टर्सने 29 व्या मिनिटाला गॅरी हूपरद्वारे पेनल्टीवर बरोबरी साधली. या निकालाने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. चेन्नईन एफसीचे आठवे आणि केरळ ब्लास्टर्सचे दहावे स्थान यामुळे कायम राहिले. चेन्नईनला विसाव्या सामन्यात अकरावी बरोबरी पत्करावी लागली. तीन विजय व सहा पराभवाने त्यांचे 20 गुण झाले. केरळ ब्लास्टर्सची 19 व्या सामन्यांत आठवी बरोबरी होती. तीन विजय व आठ पराभवाने त्यांचे 17 गुण झाले.
या सामन्यात चेन्नईन एफसीच्या लालियानझुआला छांगटेला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तिसऱयाच मिनिटाला त्याने केलेल्या क्रॉसवर जाकूब सिल्वेस्टरचा हेडरने गोल नोंदविण्याचा यत्न थोडक्यात हुकला. दहाव्याच मिनिटाला चेन्नईन एफसीने गोल करून आघाडी घेतली. एडवीन वंसपॉलने दिलेल्या पासवर फातखुल्लोएवने ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सला चकविले आणि चेंडू जाळीत टोलविला. चेन्नईन एफसीची ही आघाडी जास्त वेळ टिकली नाही आणि केरळ ब्लास्टर्सने पेनल्टीवर बरोबरी साधणारा गोल केला. चेन्नईनचा बचावपटू दीपक टांग्रीने चेंडू हाताळल्याबद्दल रेफ्री प्रतीक मोंडलने ब्लास्टर्सला पेनल्टी दिली. याचा फायदा घेत गॅरी हूपरने प्रतिस्पर्धी गोलरक्षक विशाल कैथला वेगळय़ा कोंडीत पकडून गोल नोंदविला. दुसऱया सत्रात केरळ ब्लास्टर्सच्या राहुल के. पी. याने गॅरी हूपरच्या पासवर गोल करण्याची सोपी संधी दिशाहीन फटका हाणून वाया घालविली. सामन्याच्या 78 व्या मिनिटाला चेन्नईनच्या लालियानझुआला छांगटेही अनिरुद्ध थापाच्या पासवर गोल करण्यात अयशस्वी ठरला. त्यानंतर 80 व्या मिनिटाला चेन्नईन एफसीच्या इनेस सिपोव्हीचला सामन्यात दोन एलो कार्डे पडल्याने रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्यात आले. शेवटच्या क्षणी ब्लास्टर्सच्या विसेंत गोमिसने जॉर्डन मरेने दिलेल्या पासवर गोल करण्याची सोपी संधी गमविल्याने त्यांची विजयी गोल करण्याची संधी हुकली.