जीएसटी नियमांचा निषेध नोंदवण्याचा बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / सातारा
जीएसटी नियमांच्या अन्यायकारक अटी व ऑनलाइन व्यवसायामुळे व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाविरोधात शुक्रवार दि. २६ रोजी व्यापाऱ्यांची शिखर संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स यांनी पुकारलेल्या भारत बंदला सातारा येथील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने पाठिंबा देत शुक्रवारी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.सातारा शहरातील सर्व व्यापारी या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला.
सातारा सातारा शहरातील व्यापारी असोसिएशनच्या बैठकीला प्रकाश गवळी, सुनील झंवर, अजित शहा, लालू सारडा, अशोक बादापुरे, शेखर घोडके, प्रवीण राठी, सुदीप भट्टड, अमीन कच्ची, राजू गोडसे यांच्यासह सातारा शहरातील सर्व व्यापारी संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते. केंद्र सरकारने जीएसटी बाबत जी नियमावली केली आहे, त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दि.26 रोजी सातारा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापले सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे ठरविलेले आहे.
भारत बंदला सर्व व्यापारी व छोटे व्यावसायीक यांनी आपली दुकाने बंद ठेऊन या बंदला प्रतिसाद द्यावा, तसेच जनतेने सुद्धा या बंदला पाठींबा देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. सातारा व्यापारी महासंघाच्या सर्वांनी एकजुटीने या विरोधात मोठा लढा उभारणे आवश्यक आहे. त्यादिवशी प्रत्येक संघटनेच्या एका सदस्याने उपस्थित राहून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात येणार आहे. हा लढा नुसता जीएसटी विरोधात नसून मोठमोठ्या मॉल व डी मार्ट रिलायन्स स्मार्ट जिओ स्मार्ट यासारख्या मॉल मूळे किरकोळ व्यापारी संपुष्टात येऊ लागला आहे. किरकोळ दुकानदार शेतकरी यांच्यावर आत्ताही वेळ आली आहे. काही दिवसानंतर नोकर वर्गावर पण येऊ शकते. त्यामुळे आत्ताच तातडीने पावले उचलून सर्वांनी विरोध करावा,अशी माहिती मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स सातारा शहराध्यक्ष राजू गोडसे यांनी दिली.